esakal | लग्न की करिअर ? मुलींपुढे पडला प्रश्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage or career question arises in front of girl

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर, एप्रिल मधील राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली गेली, त्यामुळे मुलींनी आपले गाव गाठले. पण आता सहा महिने उलटून गेले तरी बहुतांश मुलीं गावाकडेच आहेत. गावाकडे अभ्यास करताना मुलींना लग्नाबद्दल विचारणा होऊ लागली आहे. इतर वेळी वय 25 वय झाले की लग्नासाठी दबाव वाढायचा, पण आता कोरोनामुळे नुकताच अभ्यास सुरू केलेल्या मुलींच्या मागे ही तगादा लावला आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी, पाहुणे घरी आले की किंवा फोन केला तरी आमच्या लग्नाचा विषय हमखास काढतात. आई-वडिलांवर समाजाचा दबाव वाढत चालल्याने तेही लग्नासाठी आग्रह धरत आहेत.

लग्न की करिअर ? मुलींपुढे पडला प्रश्‍न

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील/महेश जगताप

पुणे : "मला अधिकारी व्हायचे आहे, त्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षेचा मन लावून अभ्यास करत आहे, पण आता लॉकडाऊनमध्ये घरी असल्याने जो तो घरी येतो आणि माझ्या लग्नाचा विषय काढतो. आई-वडीलही म्हणतात, आता लग्न करून लावून टाकू. माझ्या परीने मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असले तरी मानसिक त्रास होत आहे. आपले स्वप्न धुळीस मिळणार का? असा विचार डोक्‍यात घोंघावत आहे. लॉकडाऊनमध्ये याच गोष्टीचा खूप त्रास झालाय.'' अशी शब्दात पायल देशमुख ( नाव बदललेले आहे) तिच्या भावना भरभरून व्यक्त करत होती. एकीकडे आईवडिलांना लग्नाबद्दल वाटणारी चिंता रास्त असली तरी मला संधी दिलीच पाहिजे, लोकांचे कशाला ऐकायचे असा तिचा सूर होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शासकीय नोकरीमध्ये जाण्यासाठी मुलींना 30 टक्के आरक्षण आहे, त्यामुळे या परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठ्या संख्येने मुली पुण्याकडे येत आहेत. यामध्ये पारंपरिक पदवींसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण असा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी घेणाऱ्या मुलींचीही संख्या चांगली आहे. शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सुमारे 1 लाख विद्यार्थी आहेत, त्यापैकी जवळपास 35 ते 40 हजार विद्यार्थिनी आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अभ्यासासाठी येणाऱ्या मुलींची संख्या वाढत चालली आहे. आरक्षण असले तरी मोठी स्पर्धा आहे.


कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. पण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुली दुहेरी संकटात सापडल्या आहेत. "सकाळ'ने या मुलींशी चर्चा केल्यानंतर त्यांची व्यथा समोर आली आहे.


पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर, एप्रिल मधील राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली गेली, त्यामुळे मुलींनी आपले गाव गाठले. पण आता सहा महिने उलटून गेले तरी बहुतांश मुलीं गावाकडेच आहेत. गावाकडे अभ्यास करताना मुलींना लग्नाबद्दल विचारणा होऊ लागली आहे. इतर वेळी वय 25 वय झाले की लग्नासाठी दबाव वाढायचा, पण आता कोरोनामुळे नुकताच अभ्यास सुरू केलेल्या मुलींच्या मागे ही तगादा लावला आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी, पाहुणे घरी आले की किंवा फोन केला तरी आमच्या लग्नाचा विषय हमखास काढतात. आई-वडिलांवर समाजाचा दबाव वाढत चालल्याने तेही लग्नासाठी आग्रह धरत आहेत. अशा वेळी या मुली अजून किमान एकदोन तरी वर्ष तरी द्या अशी विनवणी करत पालकांना करत आहेत. याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होऊन ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षांमध्ये आपले कसे होणार याचीही चिंता त्यांना वाटत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद जिल्ह्यातील अश्‍विनी पवार ही गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे, ती म्हणाली, लॉकडाऊनमुळे मला पुणे सोडावे लागले, रूमच्या भाड्याचा खर्च होत असल्याने रुम सोडावी लागली. आता पुन्हा पुण्यात कधी येईल माहिती नाही. पुढच्या महिन्यात परीक्षा असल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असताना घरात सतत लग्नाचा विषय काढला जात आहे. लग्न करणे कोणालाही चुकलेले नाही, पण आम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे, हे मी घरातही समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे.''

म्हणून मुली जात नव्हत्या गावाकडे
"कोरोना'मुळे मुली गावाकडे गेल्या, पण यापूर्वी अनेक मुली सुट्ट्यांमध्ये देखील गावाकडे जाण्याचे टाळत. एक क्‍लास संपला की लगेच दुसरा क्‍लास लावून पुण्यात रहात असत. त्यामागे लग्न हे प्रमुख कारण असल्याचे मुलींशी बोलताना समोर आले. गावाकडे, नातेवाइकांकडे किंवा एखाद्या लग्नाला गेले की "अधिकारी कधी होणार?, उशीर होईल, आता लग्न करून टाका' असे पाहुणे बोलतात. आई वडिलांची इच्छा नसली तरी त्यांना हे सर्व ऐकून घ्यावे लागते, नंतर त्याचा आमच्यावर दबाव येतो.'' असेही मुलींनी सांगितले.

खंबीर व्हा ! समजावून सांगा...
"स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यावर लगेच यश मिळते असे नाही, त्यासाठी थोडा वेळ लागतो. पण मुलींना घरच्यांकडून वेळ मिळायला हवाच. लॉकडाऊन काळात मुलींच्या घरी लग्नाचा विषय निघत आहे, त्यामुळे अनेक मुली खचून जातात. या स्थितीत मुलींनी त्यांचा आत्मविश्‍वास डळमळीत होऊ न देता आई-वडिलांना विश्‍वासात घेऊन समजावून सांगा, ते तुमचे नक्की ऐकतील. समाजानेही मुलींच्या स्वप्नात अडथळा न होता त्यांना अधिकारी व्हावे यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.'' असे आवाहन 2020 राज्यसेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या पर्वणी पाटील यांनी केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- पुण्यात सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात
- क्‍लास व्यतिरिक्त एका महिन्यासाठी सुमारे 10 हजार खर्च
- भरती प्रक्रियेत आरक्षण 30 टक्के आरक्षण, पण स्पर्धा मोठी
- अभियात्रींकी, औषधनिर्माण क्षेत्रात पदवी घेणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढतय

loading image