

पुणे, ता. २७ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पदाधिकाऱ्यांविरोधातील अविश्वास ठरावाच्या वैधतेबाबत दोन गटांकडून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठरावाचे पुढे काय होणार आणि ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांचे भवितव्य काय, असा पेच निर्माण झाला आहे. या वादाचा परिणाम शंभराव्या साहित्य संमेलनावरही होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी मंडळातील सदस्यांविरोधात अविश्वास ठराव करावयाचा झाल्यास लेखी मत कार्यकारी मंडळाने दोन तृतीयांश बहुमताने व्यक्त केले पाहिजे, अशी तरतूद ‘मसाप’च्या घटनेत आहे. २७ पैकी २१ सदस्यांच्या अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या करून तो मांडल्याने या तरतुदीचे पालन झाले आहे. संबंधित सभासदाला किंवा पदाधिकाऱ्याला १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना देऊन कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे, अशीही तरतूद आहे.
घटनेनुसार अशी पूर्वसूचना देऊन त्यासाठी कार्यकारी मंडळाची सभा बोलावण्याचा अधिकार प्रमुख कार्यवाह यांना असतो. मात्र या प्रकरणात प्रमुख कार्यवाह यांच्यावरही अविश्वास ठराव असल्याने विश्वस्त मंडळाकडे हा अधिकार जाण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्ताव कार्यकारी मंडळात दोन तृतीयांश बहुमताने संमत झाल्यास संबंधित व्यक्तीस कळवल्यानंतर तो सभासद अथवा पदाधिकारी आपल्या स्थानापासून मुक्त झाल्याचे समजण्यात येईल, असेही घटनेत नमूद आहे.
‘मसाप’चे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी अविश्वास ठरावाबाबत घटनेप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अविश्वास ठराव मांडणाऱ्या सदस्यांनी मात्र दोन तृतीयांश सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने हा ठराव संमतच झाला आहे, असा दावा केला. त्यामुळे या ठरावावर आता काय कार्यवाही केली जाते, विश्वस्त काय पावले उचलणार, यावर पदाधिकाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे. अविश्वास ठराव मांडणाऱ्या सदस्यांचे मन वळवण्याचा प्रयत्नही केला जाण्याची शक्यता आहे.
शंभराव्या संमेलनाचे काय होणार?
‘मसाप’चे पदाधिकारीच अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावरील अविश्वास ठराव संमत झाल्यास साहित्य महामंडळावरील पदाधिकारीदेखील बदलतील. मात्र कायदेशीर पेच कायम राहिल्यास अथवा निर्णय लांबल्यास महामंडळाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होईल. पर्यायाने अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड, कार्यक्रमांची रूपरेषा आखणे आदी नियोजनाला विलंब होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.