दौंड - दौंड शहरातील आठ अनधिकृत कत्तलखाने तीन दशकांच्या विलंबानंतर जमीनदोस्त करण्यात आले आहेत. शासकीय जागेवरील या कत्तलखान्यांमध्ये राजरोसपणे गोहत्या केली जात होती..पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात ११ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान खाटीक गल्ली, कसाई मोहल्ला, भीमा नदीकाठच्या ईदगाह मैदान परिसरातील आठ अनधिकृत कत्तलखाने यंत्रांच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. भीमा नदीच्या पूररेषेत शासकीय जागेवर ही कत्तलखाने बांधण्यात आली होती. दौंड पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्यासह पुणे ग्रामीण पोलिस दलाकडील अतिरिक्त पोलिस बंदोबस्त कारवाई दरम्यान तैनात करण्यात आला होता..राज्य शासनाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी गायीला राज्यमाता - गोमातेचा दर्जा दिला आहे. तरीही दौंड शहरात मोठ्या प्रमाणावर गोहत्या सुरू आहे. शहरातील कसाई मोहल्ला, खाटिक गल्ली, ईदगाह मैदान व परिसरातील काटेरी झुडपांमध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये राजरोस गोहत्या केली जाते. गोरक्षकंनी वेळोवेळी पुणे ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार दौंड पोलिसांनी या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर धाडी टाकून गोमांस जप्त करण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु दौंड नगरपालिका प्रशासन या कत्तलखान्यांकडे जाणीवपूर्वकरित्या दुर्लक्ष करीत होते..दौंड शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये अनिर्बंधपणे दररोज गोहत्या केली जात असून गोमांसाची मुंबई, पुणे व अन्य भागात वाहतूक केली जात आहे. दौंड शहर व परिसरातील बेकायदेशीर कत्तलखाने, चमड्याचे गोदाम, गोमांस विक्री व साठा करण्यासाठी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड तातडीने हटविण्याची मागणी प्रलंबित होती.गोहत्या केल्यानंतर गायीच्या रक्ताची व अनावश्यक मांसाची परिसरात व भीमा नदी पात्रात विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिल्याने नगरपालिका प्रशासनाने कारवाईसाठी पुढाकार घेतला. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार व दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली..पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी २३ मार्च २०२६ रोजी दौंड परिसरात गोहत्या करणार्या टोळीचा सदस्य हसन उर्फ लड्डू लाला हाशमी कुरेशी (वय-२२), जमिल ईस्माईल कुरेशी (वय-२४) व फैजान अब्दूल कुरेशी (वय-३८, तिघे रा. खाटीक गल्ली, दौंड) यांना दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे. गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणार्या टोळीतील या तिघांना पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील दौंड, बारामती, हवेली व इंदापूर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आलेले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.