मसूर : मसूर येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था : वाढलेले तण, पाण्याची अनिशिता, सुविधांचा अभाव कायम

मसूर : मसूर येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था : वाढलेले तण, पाण्याची अनिशिता, सुविधांचा अभाव कायम

Published on

मसूर स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत

अडचणींचा सामना; ग्रामस्थांत नाराजी, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

मसूर, ता. २ : येथील स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे अंत्यसंस्कारांच्या संख्येतही वाढ झाली असताना मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही स्मशानभूमीची दुरवस्था दूर न झाल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.
स्मशानभूमी परिसरात झाडांचा प्रकर्षाने अभाव जाणवतो. पूर्वीच मर्यादित असलेली झाडे आता वाळून गेल्याने संपूर्ण परिसर उजाड दिसत आहे. झाडांअभावी पक्षीही फिरकत नसल्याचे नागरिक सांगतात. रक्षाविसर्जनदिवशी पक्षी न दिसल्याने काही कुटुंबांत चिंता आणि अस्वस्थता निर्माण होत आहे.
स्मशानभूमीच्या सभोवताली उंच गवत वाढले असून, आजूबाजूला घाण साचली आहे. सरणासाठी वापरण्यात येणारी लोखंडी जाळी मोडकळीस आली आहे. ती वापरण्यायोग्य राहिली नाही. पावसाळ्यात चिखल आणि गवतामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना चालणेही कठीण होते. या सर्व कारणांमुळे अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना शारीरिक, तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो.
ग्रामपंचायतीने स्वच्छता व गावाच्या देखभाल, विकासासाठी निधी खर्च केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात कामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून आरोप केला जात आहे. स्मशानभूमीतील पाण्याची व्यवस्था दुरुस्त न करणे, नियमित तण न काढणे, वृक्षलागवड न करणे आणि नियमित स्वच्छतेकडे दुर्लक्ष या बाबी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याची भावना ग्रामस्थांत आहे. याविषयी लवकरच ग्रामसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, नियमित स्वच्छता व वृक्षलागवड करून परिसरातील तण काढून, स्मशानभूमीचा परिसर सुसज्ज करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

...............
काेट
...........

स्मशानभूमीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. चालतानाही भीती वाटते. कधी पाणी असते, तर कधी नसते. झाडांअभावी कावळेही येत नाहीत. प्रशासनाने तत्काळ तण काढावे, पाण्याची सोय, वृक्षलागवड आणि स्वच्छता करावी.

- गणेश मोरे,
ग्रामस्थ, मसूर.
.....................


स्मशानभूमीतील पाण्याची सुविधा दुरुस्त करणे, तण व गवत काढणे, नवीन झाडांची लागवड करणे, स्वच्छता व आवश्यक डागडुजीची कामे तातडीने हाती घेतली आहेत. ही कामे लवकरच पूर्ण केली जातील. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ, व्यवस्थित व आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

- बालाजी मेडेवाड
ग्रामविकास अधिकारी, मसूर


B02416
गणेश माेरे


B02415
मसूर : स्मशानभूमीतील वाढलेले गवत व झालेली दुरवस्था.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com