मावळ पंचायत समितीवर कोणाची सत्ता?
वडगाव मावळ, ता. ५ : एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता १९९२ पासून गेली तीस वर्षे मावळ पंचायत समितीवर असलेली सत्ता टिकविण्यासाठी भाजपने तर ती खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून जोर लावला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इतिहासात ग्रामीण भागातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या मावळ पंचायत समितीवर सुरवातीची अनेक वर्षे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. १९९२ मध्ये पंचायत समितीमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठ्या टाकून कौल घेण्यात आला व नशिबाने सभापती व उपसभापती या दोन्ही पदांचा कौल भाजपच्या बाजूने गेला. सभापतीपदी एकनाथराव टिळे तर उपसभापती रूपलेखा ढोरे यांची निवड झाली होती. त्यानंतर १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीतही भाजपने बाजी मारली व रूपलेखा ढोरे भाजपच्या पहिल्या महिला आमदार झाल्या होत्या. त्यापुढील काळात या पक्षाचा यशाचा आलेख वाढतच गेला. जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा चांगली कामगिरी केली. मात्र, पंचायत समिती गणांमधील कामगिरीत भाजप सरस राहिला. एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता सुमारे तीस वर्षे पंचायत समितीवर भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले.
२०१९ नंतर परिस्थितीत बदल
मावळ तालुक्यात १९९५ पासून सलग पंचवीस वर्षे भाजपचा आमदार होता. २०१९ च्या निवडणुकीत तालुक्यात सत्तांतर झाले. पूर्वाश्रमीचे भाजपच्या असलेल्या विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन यश संपादन केले. राष्ट्रवादीला प्रथमच आमदारकी मिळाली. गेल्या निवडणुकीतही पक्षाने त्यांनाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिली व त्यातही त्यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रथमच पार पडत आहेत. नुकत्याच झालेल्या तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत या पक्षाने चांगले यश मिळवले. तळेगावचे नगराध्यक्षपद भाजपकडे तर लोणावळा व वडगावचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत आहे. गेल्या तीस वर्षांची सत्ता कायम राहण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीमध्ये परिवर्तनाची आस लागलेली आहे. त्यातच पंचायत समितीची मुदत संपल्यानंतर तब्बल चार वर्षांच्या कालखंडानंतर ही निवडणूक होत असल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
तुल्यबळ उमेदवारांमुळे चुरस
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागा आहेत. सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या वडगाव शहर नगरपंचायत झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून बाहेर पडले आहे. त्यामुळे पूर्वीच्या पंचायत समिती मतदारसंघांच्या रचनेत मोठे फेरबदल झाले आहेत. राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व १५ जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजप चौदा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तीन, काँग्रेस दोन तर शिवसेना शिंदे व वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी एक जागा लढवत आहे. पाच अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवारांमध्ये आहे. इतर पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार काही मतदारसंघातील निकालावर परिणाम करण्याची शक्यता आहे. खडकाळा-कार्ला, वराळे-इंदोरी, सोमाटणे-चांदखेड या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असलेल्या मतदारसंघांप्रमाणेच कुसगाव बुद्रुक-काले या सर्वसाधारण असलेल्या एकमेव मतदारसंघातही चुरशीच्या लढती होत आहेत. जिल्हा परिषदेप्रमाणेच मावळ पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी संख्याबळ आवश्यक असल्याने पंचायत समिती मतदारसंघांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने लक्ष केंद्रित करून तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे टाकवे बुद्रुक, वराळे, इंदोरी, कार्ला, कुसगाव बुद्रुक, काले, सोमाटणे या गणांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असल्याने या वर्गासाठी एकमेव राखीव असलेल्या चांदखेड पंचायत
समिती गणातील लढतीकडेही सर्वांचे लक्ष आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून प्रचाराची यंत्रणा राबवली आहे.
मतदारांना भावनिक आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सहानुभूतीवर स्वार होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्षाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात रक्षाकलश दर्शन यात्रेचे आयोजन करून मतदारांना भावनिक आवाहन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या सहानुभूतीचा लाभ होऊ नये यासाठी भाजपही प्रयत्नशील आहे. निवडणुकीतील यशासाठी सहानुभूतीप्रमाणेच पक्षाच्या उमेदवाराची गाव पातळीवरील प्रतिमा, त्याचे स्थानिक लोकांशी असलेले संबंध व त्याने समाजहितासाठी राबविलेले उपक्रम या बाबीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. निवडणुकीतील चुरस लक्षात घेता उमेदवारांकडून शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. एकूणच गेल्या सहा वर्षांपासून बदलेल्या राजकीय परिस्थितीत गेली तीस वर्षे मावळ पंचायत समितीवर असलेली सत्ता भाजप कायम राखणार की पंचायत समितीमध्ये परिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होणार याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांप्रमाणेच निवडणूक रिंगणात असलेल्या इतर पक्षांच्या उमेदवारांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

