

टाकवे बुद्रुक, ता.१७ : पावसाळा तोंडावर आल्याने मावळात सध्या राब भाजायची (रानवा पेटवायची) तसेच शेती मशागतीला सुरुवात झालेली आहे. शेतीची साफसफाई करणे, शेणखत पांगवणे, नांगरणी करणे अशी विविध कामे मावळच्या अनेक भागात शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहेत.
मावळात अनेक भागात आजही पारंपरिक श्रमाधारित शेती केली जाते. ही पद्धत उपलब्ध मानवी श्रम आणि मूलभूत साधने याचा वापर करून जपली जात असल्याचे चित्र दिसून येते. सध्या राब तयार करून भाजण्याची लगबग सुरू आहे, वातावरणातील बदल आणि अचानक येणाऱ्या पावसामुळे भाजणीवर परिणाम होतो. त्यामुळे लवकर आणि चांगल्या तापमानात भाजणी उरकून राब तयार केला जातो. ही पद्धत कमी खर्चिक असून उपलब्ध मानवी श्रमाचा वापर करून केली जाते. यामुळे झाडांचे नियंत्रण, कुरण क्षेत्राची वाढ आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यासही मदत होते. शेतातून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग सरपण म्हणूनही केला जातो.
मावळात अशी भाजतात राब
भात पेरणीच्या आधी जमीन सुपीक आणि तणमुक्त करण्यासाठी जमिनीवर झाडांच्या फांद्या, पालापाचोळा, गवत आणि शेण यांचा थर रचून तो जाळून जमीन भाजली जाते. या प्रक्रियेला राब भाजणे असे म्हटले जाते. डोंगराळ भागात याला रानवा पेटवणे असे म्हणतात. या प्रक्रियेत उष्णतेमुळे जमिनीतील नको असलेल्या तणांच्या बिया जळून नष्ट होतात. तसेच हानिकारक कीटक आणि रोगजंतू मरतात. पालापाचोळा आणि शेण जळाल्यामुळे जमिनीला उत्तम प्रकारची राख मिळते. या प्रक्रियेमुळे भाताची रोपे जोमदार, निरोगी आणि मजबूत वाढतात.
मावळातील पठारांवर पारंपरिक शेती
डोंगराळ आणि चढ-उतार असलेल्या भागात बैलांच्या साहाय्याने नांगरणी करणे कठीण असल्याने शेतकरी कुदळ, पंजा व इतर हात साधनांच्या मदतीने शेती करतात. या भागात प्रामुख्याने नाचणी, वरई, सावा आणि तीळ यांसारखी हवामानाला अनुकूल पिके घेतली जातात. ज्येष्ठांच्या मते, ही पारंपरिक भाजणी शेती पद्धत केवळ खर्चिक शेतीला पर्याय नसून डोंगराळ भागात पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीचा उत्तम नमुना आहे.
पाले पठार : या ठिकाणी रानवा पेटवताना शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.