मायणी गट : सुरेंद्र गुदगे विरुद्ध सूरज पाटील लढतीची शक्यता
मायणी गटात सुरेंद्र विरुद्ध उगवणार ‘सूरज’?
इतर मागास प्रवर्ग आरक्षणाने पुन्हा उंचावल्या आशा; भाजपपुढे उमेदवारीचे आव्हान
संजय जगताप : सकाळ वृत्तसेवा
मायणी, ता. १६ : मायणी गट इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पुन्हा एकदा सुरेंद्र गुदगे आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे मोठे आव्हान विरोधी भाजपपुढे असताना, मायणीतीलच ॲड. सूरज पाटील यांना ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे रिंगणात उतरवतील अशी चर्चा आहे.
इतर मागास प्रवर्गासाठी मायणी गट आरक्षित जाहीर झाल्यापासूनच सुरेंद्र गुदगेंनी जनसंपर्कात नेहमीपेक्षा वाढ करून प्रचाराचा धडाका लावला आहे. पुन्हा ‘सुरेंद्रदादा’ या भावनेने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आनंदाचे भरते आले आहे, तर अनपेक्षित आरक्षण पडल्याने तगडा उमेदवार देण्याचे महासंकट भाजप आणि काँग्रेसपुढे उभे ठाकले. चौखूर उधळत असलेला गुदगेंचा अश्वमेध रोखण्याचे मोठे आव्हान विरोधकांपुढे आहे. त्यांचा जनसंपर्क, केलेली विकासकामे पाहता गुदगेंच्या विरोधात दंड थोपटण्यास सहज कोणी तयारी दर्शवित नाही. मात्र, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा आशीर्वाद मिळाल्यास निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी येथील ॲड. सूरज पाटील यांनी दाखविल्याची चर्चा आहे. त्यांनी गटातील गावभेटींना सुरुवातही केली आहे. त्याशिवाय समाज माध्यमावरही त्यांनी भाजपचे उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ॲड. पाटीलच उमेदवार म्हणून जाहीर होणार की माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या समन्वयातून वेगळंच काही होणार? याबाबतही राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे.
अन्यही नावे चर्चेत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून डॉ. उदय माळी, ॲड. तुकाराम माळी आणि ॲड. रोहित पाटोळे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र त्यांचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांकडून राजकीय हालचाली होताना दिसत नाहीत, तरीही मत विभागणी टाळून मुख्य राजकीय शत्रू असलेल्या भाजपचे मनसुबे उधळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अखेर सुरेंद्र गुदगेंनाच समर्थन देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, मायणी गटात खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने गटातील अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले. आतापर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांत गुदगे गटाने विरोधकांना फटीही शिवू दिलेली नाही. गेल्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत गुदगे घराण्याचीच सत्ता राहिली आहे. त्यामध्ये सुरेंद्र गुदगें दोन वेळा तर त्यांच्या सुविद्य पत्नी शोभना गुदगे यांनी एकदा विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे.
गणात अनेक जण इच्छुक
दरम्यान, कलेढोण गणात खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने इच्छुकांची मांदियाळी आहे. पंचायत समितीचे माजी सभापती कलेढोणचे चंद्रकांत पवार, माजी उपसभापती हिवरवाडीचे बाळासाहेब माने, विनोद देशमुख ऊर्फ बाबुतात्या, ॲड. पी. डी. सावंत, राजूशेठ जुगदर आदीची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत.
मायणी गणासाठी ओबीसी महिला राखीव असल्याने तेथेही अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. गटासाठी मायणीत उमेदवारी दिल्यास गणांची उमेदवारी चितळी गावातच द्यावी लागणार आहे. त्यामुळे तेथे सर्वच राजकीय गटांना उमेदवार निवडीचे आव्हान पेलावे लागणार आहे. कार्यकर्त्यांची पत्नी, आई, बहिणींची मनधरणी करून घोड्यावर बसवावे लागणार आहे. त्यामुळे मायणी गणातील उमेदवाराबाबत सर्वच राजकीय गट ‘थांबा आणि पाहा’च्या भूमिकेत दिसत आहेत. अद्याप कोणत्याही नावाची चर्चा होताना दिसत नाही. दोन दिवसांत नाव पुढे येईल, असे प्रमुख कार्यकर्त्यानी सांगितले. तथापि, निवडून येण्याचे मेरिट असलेल्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी लागणार असल्याने मायणी गणातही योग्य उमेदवार देण्याचे आव्हान नेत्यांना पेलावे लागणार आहे.
..................................................
हालचालींना, कोपरा सभांना वेग
सत्ता असो वा नसो विकासकामे कशी करायची, त्यासाठी निधी कसा आणि कोणाकडून मिळवायचा, कार्यकर्त्यांची बांधलेली मोळी अधिक घट्ट कशी होईल आदी राजकीय डावपेचांसह सुरेंद्र गुदगेंनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे करीत वर्षानुवर्षे विरोधकांना सत्ता सोपानापासून दूर ठेवले आहे. आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेते आणि प्रमुख कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाले असून, गावागावांत, वाड्यावस्त्यांवर भेटीगाठी, बैठका, कोपरा सभांना वेग आला आहे. विकासकामांची आणि अन्य ठोस आश्वासने देऊन विविध जनसमुदायांची मोट बांधण्यात येत आहे.
..............................................
फोटो
सुरेंद्र गुदगे : MAY26B03219
सूरज पाटील : MAY26B03218
चंद्रकांत पवार : MAY26B03217
..............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

