

विकासकामात अग्रेसर
मायणी ग्रामपंचायत
मायणी हे खटाव तालुक्यातील एक मोठे व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यातील मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामस्थांना सोयीसुविधा देण्याबरोबरच विविध योजना ग्रामपंचायत राबवीत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सोनाली रणजित माने, उपसरपंच दादासाहेब कचरे व ग्रामसेवक शिवकुमार कोळी व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा कारभार केला जात आहे.
ऐतिहासिक महत्त्व
..
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या मायणीनगरीत ब्रिटिश राजवटीत १९३५ रोजी मायणी, अनफळे व कानकात्रे या तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत तयार करण्यात आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडच्या रणसंग्रामानंतर दक्षिण दिग्विजयाला जाताना मायणीमार्गे गेल्याचे इतिहासामध्ये नमूद आहे. आजचे मायणीतील बाजार पटांगण हे मूळच्या भुईकोट किल्ल्याच्या जागेवर उभारण्यात आलेले आहे. म्हणून आजही त्या मैदानाला कोटाचे मैदान असे म्हणतात. नंतरच्या काळात याच मैदानाला ‘गांधी मैदान’ असे नामकरण करण्यात आले. आजही मायणीमध्ये ‘गोल घुमट’ व माने गल्लीतील ‘बुरुजवाडा’ हे ऐतिहासिक पार्श्वभूमीची साक्ष देतात. संत सखू, संत सद्गुरू यशवंतबाबा महाराज मायणी, संत सद्गुरू यशवंतबाबा-सिद्धेश्वर कुरोली, संत मातोश्री सरुताई यांची जन्म आणि कर्मभूमी आहे. हेमाडपंथी श्री संगमेश्वराचे मंदिर, श्री सिद्धनाथ मंदिर, श्री यशवंतबाबा मंदिर, श्री विठोबा-बिरोबा मंदिर, श्री मुनी महाराजांचा मठ, अंबर साहेबांचा दर्गा व श्री खंडोबा मंदिर आदी धार्मिक श्रद्धास्थाने मायणीत आहेत.
स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना
..
ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये मायणीच्या पूर्व दिशेला दुष्काळापासून दिलासा मिळावा, या दृष्टीने एक शेती पाणीपुरवठा तलाव बांधलेला होता. या तलावाच्या कॅनॉलवरील पाण्यावर आधारित शेती ही समृद्ध होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मायणीनगरीत जगन्नाथराव जाधव (दादा) हे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याच विचारावर मायणीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात भारतमाता विद्यालयासह मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. श्री सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. शेतकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना केली. मायणी अर्बन बँकेची उभारणी केली. १९६० मध्ये ग्रुप ग्रामपंचायतीतून अनफळे व कानकात्रे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाल्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत सध्याची ग्रामपंचायत मायणी गावासाठी कार्यरत आहे.
१९६२ पासून २०१७ पर्यंत सलग ५५ वर्ष ही ग्रामपंचायत माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. १९६७ मध्ये भाऊसाहेब गुदगे जिल्हा परिषद सदस्य झाले. १९७२ रोजी खटाव पंचायत समितीवर सभापती झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मायणीच्या चांद नदीवर फरशी पूल बांधून पावसाळ्यामध्ये येण्या- जाण्याची सुविधा निर्माण केली. दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना रोजगार मिळवण्यासाठी गावांमध्ये पाझर तलावांची निर्मिती केली. मोराळे, मरडवाक, दगडवाडी, खातवळ व अनफळे या जवळील खेड्यांना जाणाऱ्या रस्त्यांची निर्मिती केली.
पक्षी आश्रयस्थानाचा दर्जा
..
माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तत्कालीन सरपंच, उपसरपंच व त्यांचे सहकाऱ्यांनी गावचे विस्तारीकरण करताना इंदिरानगर व मोहननगर या वसाहती नव्याने निर्माण केल्या. त्यासाठी त्यांना जागा व घरकुले उपलब्ध करून दिली. मायणीसाठी येरळा नदी उद्भव धरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर येरळवाडी धरणाचा उद्भव धरून मायणी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. माजी आमदार गुदगे यांनी आपल्या कार्यकाळात मायणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात गावातील वन जमिनीच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करून पक्षी आश्रयस्थानाचा दर्जा प्राप्त करून दिला. उच्च शिक्षणाच्या सुविधेसाठी कला व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. लक्ष्मीनगर, शिंदेवाडा, माळीनगर या उपनगरांना जाणारे पक्के रस्ते बांधले. अलीकडच्या काळात माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या मागणीनुसार अनेक सभामंडप, अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, भव्य असे भाऊसाहेब गुदगे व्यापारी संकुल, व्यायाम शाळा, क्रीडांगणे, कमानी व सामाजिक सभागृहे उभारण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी यशवंत विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीची नव्याने भव्य अशी इमारत बांधण्यात आली. गावातील सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी व पारंपरिक प्रथा, परंपरा जतन करण्यासाठी अनेक यात्रा जत्रांचे नियोजन ग्रामपंचायतीच्या व गावातील विविध ट्रस्टच्या माध्यमातून नेटक्या पद्धतीने केले जाते.
सरपंच व उपसरपंच पदांचे मानकरी
....
आजपर्यंत गावात सरपंच म्हणून काम केलेल्या विठोबा माने, बी. टी. पुस्तके, शिवाजी माने, भाऊसाहेब गुदगे, काशिनाथ माळी, आप्पासाहेब देशमुख, प्रतिभा माळी, छाया सुरमुख, यशोदा सपकाळ, सुनीता बागडे, महादेव यलमर यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांच्यासोबत उपसरपंच म्हणून पांडुरंग शिंदे, शंकर माळी, प्रकाश कणसे व शिवाजी माळी, पोपटराव ऊर्फ भगवंतराव खाशाबा साळुंखे, बापूराव माने, महादेव यलमर, आनंदराव शेवाळे, जगन्नाथ भिसे, सूरज पाटील, दादासाहेब कचरे यांनी गावच्या विकासात सहकार्य केले आहे. दादासाहेब कचरे यांनी आजवर सर्वाधिक जास्त काळ उपसरपंचपदावर राहण्याचा त्यांनी विक्रम केला आहे.
२०१७ ते २०२२ पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून सचिन गुदगे यांनी गावाच्या विकासात भर टाकण्याचे काम केले आहे. येरळवाडी धरणाचा उद्भव असलेली वाढत्या विद्युतबिलामुळे पाणीपुरवठा योजना खर्चिक असल्यामुळे मायणीसाठी इरिगेशन तलावाखाली पूर्वी खणण्यात आलेल्या शिवकालीन विहिरीचा उद्भव धरून मायणीसाठी नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. सध्या सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सोनाली रणजित माने या जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या व मायणीतील लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच ठरल्या आहेत. उपसरपंच दादासाहेब शिवाजी कचरे कार्यरत आहेत.
विविध विकासकामे मार्गी
..
सध्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत वितरण व्यवस्थेसह नवीन कनेक्शन देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावातील विविध रस्त्यांना वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते व गटारांचे काँक्रिटीकरणाचे कामकाज सुरू आहे. गावात गरीब, गरजू व बेघरांना पहिल्या टप्प्यात जवळपास १५० घरकुले व दुसऱ्या टप्प्यात २३८ घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर घेण्याचे काम ग्रामपंयचातीन केले आहे. त्यासाठी सोनाली माने, दादासाहेब कचरे, शिवकुमार कोळी व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यातील काही घरकुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावाच्या शैक्षणिक विकासात भर टाकण्यासाठी प्राथमिक शाळेची दिमाखदार इमारत उभी करण्यात आलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले आहे. गावाच्या विकासाचा आलेख कायम उंच ठेवण्यासाठी १६ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून गटारची कामे, दलितवस्ती सुधार योजनेतून गटार करणे, रस्ता मजबूतीकरण, आरसीसी गटर, वॉलकंपांउड, पेव्हर बसवणे, अभ्यासिकेची उभारणी, शौचालय उभारणीची कामे, सौर्यदिवे, बंधारा बांधणी, अंगणवाड्यांना खेळण्यांचे साहित्य, शुद्ध पाण्यासाठी ॲक्वा, एलईडी दिवे बसवणे, संगणक, डस्टबिन, शाळा, महाविद्यालयांना महिलांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड आणि त्याचे डिस्पोजल मशिन बसवणे अशी अनेक कामे केली आहेत.
ग्रामस्थांना सोयीसुविधा
--------
पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते आणि दळणवळण, सार्वजनिक दिवाबत्ती, शिक्षण आणि समाजकल्याण, महिला व बालविकास, तसेच मागासवर्गीय कल्याण निधी, पर्यावरणपूरक कार्यक्रमांची अंमलबजावणी गावात करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.