

राजगुरुनगर, ता. ६ : खेड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) या कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एसईझेडच्या खेड सिटी परिसरातून अटक केली. मयूर तानाजी हजारे (रा. कनेरसर, ता. खेड) आणि गणेश दिलीप गोरडे (रा. गोसासी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या दोघांवर खेड पोलिस ठाण्यात ‘मकोका’अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सातत्याने शोध सुरू होता. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत या आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध शोधमोहीम राबवली. त्यात दोघेही खेड सिटी परिसरात आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खेड पोलिस ठाण्यात हजर केले. या दोन्ही आरोपींविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच, खेड पोलिस ठाण्यात २०२४ आणि २०२५ मध्ये मारहाण, खंडणी, घातक शस्त्रांचा वापर आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, फौजदार शरद बांबळे, पोलीस हवालदार संदीप फड, स्वप्नील गाढवे आणि हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.