
पुणे : विमानतळाभोवतीच्या परिसरात चिकन-मटण विक्रीच्या दुकानातील कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, चिकन-मटण विक्रेत्यांकडून सर्रासपणे कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असतानाही, त्यांचे परवाने रद्द करण्याचे धाडस महापालिका प्रशासन दाखवत नाही. संबंधितांवर ठोस कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या घनकचरा विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.