‘हार्वेस्टर’मुळे ऊस उत्पादनात घट नाही तर्क निराधारः राष्ट्रीय साखर महासंघाचा दावा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३ ः हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊस कापणी केल्याने प्रति एकर सुमारे १५ टन उत्पादन घट होते, हा तर्क दिशाभूल करणारा असून त्याचा वैज्ञानिक किंवा वस्तुनिष्ठ आधार नसल्याचे राष्ट्रीय साखर महासंघाने म्हटले आहे.
उसाचे उत्पादन हे कापणीच्या पद्धतीवर नव्हे तर उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था आणि हवामान या घटकांवर अवलंबून असते, असे महासंघाने नमूद केले आहे.
कापणी ही केवळ तयार झालेला ऊस तोडण्याची प्रक्रिया असल्याने हाताने किंवा यंत्राने कापणी केल्यामुळे जैविक उत्पादनात फरक पडत नाही. ‘हार्वेस्टर’मुळे उत्पादन घटत नसून त्याचा संबंध प्रत्यक्षात कापणीदरम्यान होणाऱ्या हानीशी आहे. ही हानी प्रामुख्याने शेतजमीन समतल नसणे, शिफारशीनुसार ओळीतील अंतर न राखणे, ऊस आडवा पडलेला असणे, बेस कटरची चुकीची उंची, अपुरी ओलावा स्थिती आणि प्रशिक्षित चालकाचा अभाव या कारणांमुळे होते. ही सर्व कारणे हार्वेस्टर तंत्रज्ञानातील दोषामुळे व्यवस्थापनातील त्रुटींमुळे निर्माण होतात.
आयसीएआर, राज्य कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी केलेल्या अभ्यासानुसार योग्य नियोजन आणि व्यवस्थापन असल्यास हार्वेस्टरद्वारे कापणी करताना होणारी हानी केवळ दोन ते पाच टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते, जी हाताने कापणीइतकीच आहे. त्यामुळे प्रति एकर १५ टन उत्पादन घट होणे हे वैज्ञानिकदृष्ट्या अवास्तव आणि अप्रमाणित आहे. ब्राझील व ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये ९५ ते १०० टक्के ऊस कापणी यांत्रिक पद्धतीने होते, तरीही तेथे ऊस उत्पादन आणि साखर उतारा भारतापेक्षा जास्त आहे. हे हार्वेस्टर तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेचे ठोस उदाहरण आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर अपरिहार्य असून काही माध्यमांतील अपप्रचारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. साखर उद्योगासाठी हे घातक ठरू शकते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी अशा विषयांवर वैज्ञानिक आणि प्रमाणित माहितीच्या आधारेच निष्कर्ष काढावेत, असे आवाहन नवी दिल्ली येथील ‘नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड’ने केले आहे.
यांत्रिक कापणीचे महत्त्व
- श्रम व वेळ वाचवणारी
- शाश्वत शेतीसाठी उपयुक्त पद्धत
- योग्य शेततयारी, योग्य पीक रचना आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असल्यास उत्पादनात कोणतीही घट होत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

