कास - मेढा एस टी विभागाचे वेळापत्रक बेभरवशी....
मेढा एसटी डेपोचे वेळापत्रक बेभरवशी
गाड्यांच्या अनियमित फेऱ्या; प्रवासी त्रस्त
कास, ता. २३ : दुर्गम अशा जावळी तालुक्यात दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेल्या सार्वजनिक परिवहन विभागाचा कारभार अत्यंत बेभरवशी झाला आहे. कोणत्या एसटी बसचा फेरा कधी रद्द होईल, याचा नेम नसल्याने तालुक्यातील प्रवासी त्रस्त झाले आहेत.
जावळी तालुक्यात एसटीमार्फत मेढा ते सातारा, केळघर, बोंडारवाडी विभाग, कुसुंबी विभाग, कुडाळ, पाचवड, करहर आणि सायगाव विभागात एसटीच्या फेऱ्या सुरू असतात. यात सातारा-मेढा फेरी दर अर्धा तास ते एक तासाच्या दरम्यान सुरू असते, तर बाकी ठिकाणी दर दोन तासाला एखादी गाडी असते. दुर्गम बामणोली भागात तर रामेघर गाडीच्या रूपाने एकमेव गाडी आहे, तर डोंगरमाथ्यावरील मेढा-एकीव सातारा हीसुद्धा एकच फेरी असते. ठराविक फेऱ्या असतानाही फेरी वेळेवर होईल, याची खात्री नसते.
याचा सर्वाधिक फटका कुसुंबी भागातील सेवेला बसत असून, दोन-अडीच तासांशिवाय या भागात फेरी नाही. त्यामुळे एखादी फेरी रद्द झाली, तर प्रवाशांना चार-चार तास ताटकळत बसावे लागते. हा सर्व परिसर दुर्गम असून, दुसऱ्या कोणत्या वाहनांची सोय नाही. त्यामुळे प्रवाशांचा अख्खा दिवस वाया जातो.
आज वेण्णानगर येथे रस्ता खोदल्याने कुसुंबी मार्गावरील वाहतूक मेढा ते वेळेदरम्यान सुरू होती. साताऱ्यावरून कुसुंबीकडे जाणाऱ्या प्रवाशांना याबाबत काहीच माहीत नव्हते. त्यामुळे सातारा डेपोत अनेक जण ताटकळत बसले होते. अखेर एसटी का लागत नाही, म्हणून मेढा नियंत्रकांना फोन केल्यावर ही अडचण सांगितली जात होती. या घोळामुळे अनेक प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जाण्याबरोबरच वेळेचाही अपव्यय सोसावा लागला. स्वच्छ बसस्थानकाचे पारितोषिक मिळवून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या मेढा डेपोतील अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांच्या सोयीसाठी जागरूकता दाखवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त होत आहे.
चौकशी कक्ष नावालाच
मुख्य बसस्थानकात चौकशी कक्षात गेले तर येथील दोन माणसं कायम रजिस्टरमध्ये डोक घालून बसलेली असतात. साहेब, साहेब आमकी गाडी कधी आहे, असं विचारल्यावर फुरसतीने डोकं वर काढून थातूरमातूर उत्तरे देतात. मेढा एसटी विभागाच्या फेरीबाबत विचारण्यात आले, तर आम्हाला काही माहीत नाही, एसटी आल्यावर लागेल, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मेढा नियंत्रण कक्षातही फोन केला असता व्यवस्थित माहिती दिली जात नाही. फोनवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्याची भाषा ही अरेरावीची असते. त्यामुळे चौकशी कक्ष हे फक्त नावापुरतेच असल्याचे प्रवशाांचे म्हणणे आहे. लोकांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही.
कोट -
मी रविवारी मुंबईवरून साडेसहा वाजता सातारा बसस्थानकात पोहोचलो. कुसुंबी गाडी कधी आहे, याची विचारणा केल्यावर साडेसात वाजता आहे, असं सांगण्यात आलं. तोपर्यंत इतर प्रवाशांसोबत थांबलो असता साडेसात वाजता गाडी न लागल्याने पुन्हा चौकशी केली असता आज रविवार असल्याने गाडी नसते, असे सांगण्यात आले. आता साडेनऊ वाजता कुसुंबी गाडी आहे, असे सांगितले. मुंबईवरून प्रवास करून चार-चार तास ताटकळत बसावे लागत असेल तर काय करायचे? याची दखल कोण घेईल का?
- जयराम चिकणे
प्रवासी, गांजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

