कऱ्हाड डॉक्टरांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर लगाम

कऱ्हाड डॉक्टरांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर लगाम
Published on: 

डॉक्टरांच्या जाहिरातींवर लगाम

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. १४ ः वैद्यकीय जाहिरातींद्वारे रुग्णांची दिशाभूल करणे, अवास्तव उपचारांचे दावे करणे आणि व्यावसायिक प्रसिद्धीसाठी रुग्णांच्या अनुभवांचा गैरवापर करणे आता डॉक्टरांना चांगलेच महागात पडणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने डॉक्टर, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांच्या जाहिरातींवर निर्बंध आणले आहे. त्यासाठी कडक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर ताकीद देण्यापासून ते थेट नोंदणी निलंबनापर्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यापारीकरण रोखून रुग्णांचे आरोग्य आणि हित जपणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
डॉक्टरांना तथ्यपूर्ण माहिती देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्याचवेळी त्यातील अतिशयोक्तीला बंदी घातली आहे. रुग्णालयाचा पत्ता, संपर्क क्रमांक, विभाग, निदान सुविधा, आपत्कालीन सेवा, मान्यता आणि उपचारांचे शुल्क यांची केवळ वस्तुनिष्ठ माहितीच देण्याची मुभा देण्यात आली आहे. स्वतःला बेस्ट डॉक्टर, नंबर वन स्पेशालिस्ट किंवा शंभर टक्के यश असे श्रेष्ठत्वाचे अप्रमाणित दावे आणि रुग्णांना आकर्षित करणाऱ्या सवलती देण्यास सक्त मनाई केली आहे. उपचारांचे यश, रुग्णसंख्या किंवा वैयक्तिक कामगिरीच्या आधारावर प्रसिद्धी मिळवण्यावर पूर्ण निर्बंध घातले आहे. सामाजिक माध्यम, एआयच्या वापरावरील नियमातही बदल केला आहे. त्यात यूट्यूब आणि डिजिटल माध्यमांवरील पेड प्रमोशनचे नियम कठोर केले आहेत. त्यामध्ये बनावट फॉलोअर्स, खोटे रिव्ह्यू, कृत्रिम रेटिंग आणि सर्च रँकिंगमध्ये फेरफार करून प्रतिमा उंचावण्यास मनाई केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बनावट रुग्णांचे अनुभव किंवा दिशाभूल करणाऱ्या उपचारांचे दावे तयार करता येणार नाहीत, असेही स्पष्ट केले आहे.

चौकट
--------
अशी होणार कारवाई
--------------
- पहिली वेळ ः इशारा व नैतिकतेचे प्रशिक्षण दिले जाणार
- दुसरी वेळ ः निषेध नोंदवून आर्थिक दंड आकारणार
- तिसरी वेळ ः तीन ते सहा महिन्यांसाठी डॉक्टरांची नोंदणी निलंबित
- गंभीर उल्लंघन : सहा ते बारा महिने निलंबन
- वारंवार नियम मोडल्यास एक ते तीन वर्षांसाठी नोंदणीतून नाव पूर्णपणे वगळले जाऊ शकते.
- कारवाई करण्यापूर्वी डॉक्टरांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार
- निर्णयाविरोधात ६० दिवसांत एनएमसीकडे अपील करता येणार

कोट-

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने जाहिरातबाजीबाबत डॉक्टरांसाठी कडक नियमावली आखून दिली आहे. त्यानुसार कोणालाही अवास्तव व दिशाभूल करणारी जाहिरात करता येणार नाही. डॉक्टरांनी नियमावली समजून घ्यावी आणि त्यानुसारच नियमांचे तंतोतंत पालन करावे.

-डॉ. वैभवकुमार चव्हाण
उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र


PNE26W58104
डॉ. वैभवकुमार चव्हाण


सचिन शिंदे...10:13 14-10-2026

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com