मेडिकल ऑडिटचा कारागृहांमध्ये फार्स

प्रियांका तुपे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - खडे नाहीत, असं डाळीचं वरण नाही; चपाती-भात कच्चाच, ही जेवणाची तऱ्हा. काही दुखलं-खुपलं तर औषधाची गोळी मिळणेही दुरापास्त...या मरणप्राय यातना आहेत येरवडा कारागृहातील कैद्यांच्या. एका गुन्ह्याच्या आरोपात तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेल्या एका महिलेने ‘सकाळ’शी बोलताना या यातनांचा पाढा वाचला. एकीकडे तुरुंग प्रशासन ‘मेडिकल ऑडिट’चा फार्स करीत असताना, दुसरीकडे मात्र कैद्यांची ही अवस्था असल्याचे यातून स्पष्ट होते.   

एका गुन्ह्यात या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा झाली. तीन महिन्यांनी तिची नुकतीच जामिनावर सुटका झाली. तुरुंगवासात भोगाव्या लागलेल्या यातनांची जंत्री तिने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर मांडली.  ‘‘तुरुंगात चपाती अर्धी कच्ची, कच्चा भात असेच जेवण मिळे. मानवाधिकार कार्यकर्ते येणार असतील, त्याच दिवशी चांगले जेवण मिळायचे. ॲनिमिया, हिमोग्लोबिन, कॅल्शिअम, एकही गोळी आत मिळत नाही. मरणप्राय अवस्था झाली, तरच ससूनला हलवलं जातं,’’ असे या महिलेने सांगितले. काही दिवसांपूर्वी भायखळा कारागृहातील ८० महिला कैद्यांची प्रकृती बिघडल्यानंतर राज्यातील कारागृहांचे मेडिकल ऑडिट करण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतला. यात कैद्यांसाठी असलेले पिण्याचे पाणी, अन्न, औषधे व स्वच्छता आदी बाबींची तपासणी करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, येरवडा कारागृहासह अन्य तुरुंगामंध्ये हा आदेश ‘व्हॉट्‌सॲप’वर राहिला आहे. त्यामुळे कारागृहांत परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. हेच या महिलेच्या बोलण्यातून जाणवले.

आम्हाला तुरुंग महासंचालकांकडून काळजी घेण्याच्या सूचना ‘व्हॉट्‌सॲप’वर व तोंडी दिल्या आहेत. त्यानुसार अन्न, पाणी, स्वच्छतेची काळजी घेत आहोत. 
- उत्तम पवार, अधीक्षक, येरवडा कारागृह

सर्व कारागृहांच्या अधिकाऱ्यांना कैद्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बदल होत आहे की नाही, हे आम्ही पाहणार आहोत.
- भूषणकुमार उपाध्याय, कारागृह महानिरीक्षक 

Web Title: Medical Audit Issue in Jail