डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ‘आईपण’ हिरावले

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ‘आईपण’ हिरावले
Published on

बीड, ता. १८ : बीडच्या जिल्हा रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांनीच आपल्या पेशाला काळिमा फासला आणि एका नवविवाहितेचे आईपण हिरावून घेतले. या महिलेची सिझेरियन (प्रसूती शस्त्रक्रिया) करताना तिच्या पोटात कापसाचा बोळा आणि सर्जिकल वस्तू राहिल्या. नंतर तिच्या पोटातील आतडे सडल्याने व गर्भाशय खराब झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करावी लागली. यात तिचे गर्भाशय काढावे लागले असून, ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, महिलेच्या पोटात डॉक्‍टरांचे हँडग्लोव्हज राहिल्याचा दावा तिच्‍या आईने केला आहे.

वडवणी तालुक्यातील १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड यांना प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर बाळंतपणासाठी एक ऑगस्टला बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी सायंकाळी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला कन्यारत्न झाले. वडवणीला घरी गेल्यावर अवघ्या दोन दिवसांतच संध्याला पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. ​नातेवाइकांनी तिला तत्काळ वडवणीतील खासगी रुग्णालयात नेले. परंतु उपचार करूनही ती बरी झाली नाही. तिथल्या डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी बीडमध्ये खासगी रुग्णालयात नेले, तिथे सोनोग्राफी केली, त्यावेळी संध्याच्या पोटात काहीतरी असल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. हीच बाब खासगी डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना सांगितली. त्यानंतर त्यांचा महिलेच्या नातेवाइकांना फोन आला. महिलेला जिल्हा रुग्णालयात आणा, असा निरोप त्यांनी दिला, पण नातेवाइकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जिल्हा रुग्णालयात जाण्यास नकार दिला. खासगीतील उपचाराचा खर्च अवाढव्य असल्याने आणि प्रकृती चिंताजनक बनल्याने नातेवाइकांनी नऊ ऑगस्टला संध्याला पुण्यातील एका रुग्णालयात नेले. तेथील खर्चही न पेलवल्याने अखेर १० ऑगस्टला तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिथल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी तपासणी केली, तेव्हा तिच्या पोटातच हँडग्लोव्हज असल्याचे आढळून आले. ते काढण्यात आले. गंभीर म्हणजे, पोटात संसर्ग होऊन पू झाला होता आणि आतडेही सडले होते. एवढेच नव्हे, तर तिचे गर्भाशयही पूर्णपणे खराब झाले होते. डॉक्टरांनी दोन वेळा मोठ्या शस्त्रक्रिया करून खराब आतडे आणि गर्भाशय बाहेर काढले. ​याप्रकरणी पीडितेच्या मातेने मंगळवारी (ता. १८) बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल केली. बीडच्या जिल्हा रुग्णालयात सिझेरियन करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप मातेने यात केला आहे.

‘‘संध्या गायकवाड यांना ११ ऑगस्टला पहाटे ससूनच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. १२ ऑगस्टला त्यांच्यावर लॅप्रोटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाच्या पोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान पोटात काही सर्जिकल साहित्य आढळून आले आहे. त्यांच्या लहान आतड्यात अनेक ठिकाणी अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.’’
- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com