

जोडोनिया कर
................
मेरो मन लाग्यो हरि के नाम
(उत्तरार्ध)
‘‘गढ से तो मीराबाई उतरी’’ या पदात मीराबाईची धैर्य, त्याग आणि सामाजिक विरोधाला सामोरे जाण्याची आध्यात्मिक शक्ती दिसते. हा केवळ त्यांचा भौतिक प्रवास नाही; तो वैराग्याचा प्रवास आहे. राजघराण्याचे वैभव, सुख, प्रतिष्ठा सोडून त्या ईश्वरमार्गाकडे वळतात. ‘गढ़से उतरी’ म्हणजे अहंकार, सत्ता, राजसी ओळख यांतून खाली उतरून भक्ती मार्गावर येणे. साधेपणा अंगीकारणे. खरं तर एखाद्या राजघराण्यात जन्म घेणे, राजघराण्यात लग्न होऊन जाणे, दोन्हीकडे ऐश्वर्यच ऐश्वर्य असणे हे की लौकिक अर्थाने कितीतरी भाग्याचे त्या काळी ही समजले जाईल आणि आजही समजले जाईल अशीच ही मीराबाईची परिस्थिती होती. श्रीमंती, दासदासी, भोगविलास यांच्यामध्ये सुखेनैव आयुष्य व्यतीत करण्याची संधी भाग्याने मीराबाईंना मिळाली होती. परंतु खरे आणि शाश्वत सुख, खऱ्या अर्थाने मिळालेल्या जन्माचा उपयोग करण्यासाठी, परमेश्वरी संकेतांनी मीराबाई भगवद्भक्तीकडे वळल्या. त्याबद्दल त्यांना त्यांच्या घराण्यातून प्रचंड त्रास देण्यात आला. छळ करण्यात आला. एकीकडे या त्रासाला कंटाळून, दुसरीकडे भगवद्भक्ती शांत चित्ताने करण्यासाठी मीराबाईनी एक दिवस त्यांचा प्रासाद आणि किल्ला सोडून निघून जायचे ठरवले. तशी कल्पना घरच्यांना देऊन त्या सदरचे घर सोडून निघून गेल्या. प्रथम माहेरी त्याच्यानंतर वृंदावन मथुरा द्वारका असा त्यांचा कृष्णमय प्रवास झाला. मीराबाईचे मन पूर्णतः भगवंतात गुंतले आहे. सांसारिक सत्ता, कौटुंबिक दबाव किंवा राजाज्ञा त्यांच्या अंतरंगाला स्पर्श करू शकत नाहीत. ‘साधा के साथ’ अर्थात संतसंग हा त्यांच्या जीवनाचा मार्ग बनला आहे. एकीकडे मीराबाईच्या भक्तिमार्गावर जाण्याने समाजाकडून संमिश्र प्रतिक्रिया येतात. स्त्रीने कुलमर्यादा पाळावी, घराण्याची प्रतिष्ठा राखावी, ही अपेक्षा मीराबाईवर लादली जाते. विशेषतः राजपूत कुलातील स्त्रीवर सामाजिक बंधने कठोर होती. इथे दोन संघर्ष दिसतात. कुलप्रतिष्ठा विरुद्ध ईश्वरप्रेम. सामाजिक अपेक्षा विरुद्ध अंतरात्म्याची हाक. मीराबाईसाठी भगवंतप्रेम इतके श्रेष्ठ झाले की वंश, मान, अपमान, समाजमत या सर्व गोष्टी त्यांच्या दृष्टीने दुय्यम ठरल्या. इथे मीराबाईचा संदेश असा आहे की, जेव्हा ईश्वरप्रेम अंतःकरणात जागृत होते, तेव्हा जगातील मान-अपमान, कुललाज, बंधने यांचे महत्त्व कमी होते. आत्मा आपल्या खऱ्या प्रियकराकडे म्हणजेच परमेश्वराकडे धाव घेतो.
drsunildeshpande@gmail.com
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.