

मेलेनियांच्या पुढाकाराने
ओलेश्कीमध्ये शस्त्रसंधी
युद्धात अडकलेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी पुढाकार
किव्ह, ता. २७ (पीटीआय) : अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प यांच्या पुढाकाराने रशियाच्या ताब्यातील ओलेश्की शहरामध्ये काही काळासाठी शस्त्रसंधी करण्यात आला. स्फोटके आणि सुरूंगानी वेढलेल्या या शहरातील नागरिकांची परिस्थिती प्रचंड बिकट असून, त्यांच्यापर्यंत मानवतावादी मदत पोहोचविण्यासाठी मेलेनिया आणि पोप लिओ यांच्या पुढाकाराने शस्त्रसंधी करार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या शहरामध्ये सुमारे दोन हजार नागरिक अडकले आहेत. सर्वत्र स्फोटके असून, ड्रोन हल्ल्यांची टांगती तलवार कायम असते. अन्नपदार्थांसह या नागरिकांना मूलभूत वस्तूंची प्रचंड गरज असल्याचे समोर आले होते. मेलेनिया यांच्या पुढाकारातून रशिया व युक्रेनच्या स्थानिक नागरिक संवादकांची चर्चा झाली आणि या शस्त्रसंधीचा प्रस्ताव समोर आला. पोप लिओ १४वे यांनीही युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. मानवतावादी मदत पोहोचविण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शस्त्रसंधीला परवानगी देण्याची विनंती त्यांना केली होती. युक्रेन आणि रशियाने या परिस्थितीसाठी परस्परांवर टीका केली आहे.
दरम्यान, रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये युक्रेनमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे एका विद्यापीठाच्या मैदानाचे नुकसान झाले. तर खारकिव्हमध्ये झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. अन्य एका हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.
नॉर्वे, फिनलँडच्या प्रमुखांच्या पुतीन यांच्याशी चर्चा
नॉर्वेचे पंतप्रधान योनास गार स्टोरे आणि फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. याआधी दोन्ही नेत्यांनी २० ऑक्टोबर रोजी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी चर्चा केली होती. युक्रेन, रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये पुढील महिन्यात अबुधाबी येथे चर्चा होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही नेत्यांनी ही चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.