म्यानमारमध्ये लोकमान्यांचा स्मृतिफलक

Lokmanya tilak
Lokmanya tilak

स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त उच्चायुक्तालयात कार्यक्रम; डॉ.साठेंच्या प्रयत्नांना यश
पुणे - स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतिफलकाचे म्यानमार येथील (तत्कालीन ब्रह्मदेश) उच्चायुक्तालयात एक ऑगस्टला अनावरण होणार आहे.

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षात हा स्मृतिफलक झळकणार आहे. इंग्रजांच्या विरोधात आवाज उठविल्याबद्दल लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला. त्यासाठी त्यांना शिक्षा होऊन सहा वर्षांसाठी मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. या ठिकाणी त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक यांना डांबून ठेवण्यात आलेला तुरुंग आता अस्तित्वात नाही. ती जागा आता लष्कराच्या ताब्यात आहे. ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे अभ्यासक व ‘मंडालेतील गीतारहस्य’ या पुस्तकाचे लेखक डॉ. दिलीप साठे हे मंडाले येथे गेले होते. लोकमान्य टिळकांना ठेवलेल्या तुरुंगाबाबत चौकशी केली असता तो अस्तित्वात नसल्याची माहिती त्यांना मिळाली. लोकमान्यांची कोणतीही स्मृती त्याठिकाणी नव्हती. लोकमान्यांचे छायाचित्रही तेथे नसल्याचे पाहून डॉ. साठे यांना हळहळ वाटली.

मंडालेमध्ये लोकमान्य टिळकांचे स्मारक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी ऑगस्ट २०१६ पासून परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, म्यानमार येथील भारतीय उच्चायुक्तालयाबरोबर पत्रव्यवहार सुरू केला. केवळ पत्रव्यवहारातून काही होणार नसल्याचे लक्षात आल्याने डॉ. साठे २० ऑक्टोबर २०१९मध्ये मंडालेला गेले. तेथील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना लोकमान्यांचे छायाचित्र, ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची प्रत दिली. लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे या ठिकाणी स्मारक उभारण्याची विनंती केली. 

दरम्यान, डॉ. साठे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. अवधी कमी असल्याने एक ऑगस्टला किमान त्यांचा स्मृतिफलक लावण्याची विनंती मान्य केली. लवकरच लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळाही बसविण्यात येणार असल्याचे डॉ. साठे यांना म्यानमार येथील उच्चायुक्तालयातून कळविण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोकमान्य टिळकांनी केलेला त्याग व त्यांना झालेला त्रास, भोगलेले कष्ट सर्वांना समजावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्याठिकाणी लोकमान्यांचे स्मारक उभे राहील, अशी मला खात्री आहे.
- डॉ. दिलीप साठे
 

दोन कार्यक्रम
लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त एक ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रातर्फे दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हंतावाडी विद्यापीठाचे  निवृत्त उपकुलगुरु प्रा. खी मांग चो हे बर्मी भाषेत लोकमान्यांच्या कार्याची ओळख करून देतील. लोकमान्यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यासाठी डिजिटल फोटो प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. ‘कोविड’ची समस्या लक्षात घेऊन दोन्ही कार्यक्रम ऑनलाईन होतील. उच्चायुक्तालयाच्या ‘फेसबुक’ पेजवरून हे कार्यक्रम पाहता येतील, अशी माहिती सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आसावरी बापट यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com