पानशेत धरण फुटल्याच्या आठवणीने आजही चुकतोय काळजाचा ठोका

Panshet-Dam
Panshet-Dam

पानशेत धरण फुटल्याच्या घटनेला यंदा १२ जुलैला ५९ वर्षे पूर्ण होत आहेत. यात २६३ नागरिकांना जीव गमवावा लागला. त्या थरारक आठवणी आजही ज्येष्ठ पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवताहेत. 

११ जुलैपर्यंत धरण व्यवस्थित असल्याचे सरकार जाहीर करत होते. एवढेच नव्हे, तर १२ जुलैच्या वर्तमानपत्रांत सरकारने धरण फुटले नाही. फुटणार नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा बातम्या प्रसिद्ध  केल्या होत्या. त्यामुळे लोक निर्धास्त होते. शाळा, कॉलेज, दुकाने उघडली होती. मीही सरकारी बातमीने निर्धास्त होतो. पोटपूजा केली आणि लक्ष्मी रस्त्यावरील वेस्टर्न इंडिया या पुण्यातील तेव्हाच्या सर्वांत उंच इमारतीतील ‘एलआयसी अकाउन्टस्’मध्ये कामाला लागलो. तोच रस्त्यावर गलका झाला. धरण फुटले! धरण फुटले!.. आम्ही वेस्टर्न इंडियाच्या पाचव्या मजल्यावरील गच्चीत गेलो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाहतो तर काय, लकडी पूल पाण्यात. खंडूजीबाबा चौकातील इमारती व पुलाचीवाडीतील झाडे व इमारती पत्त्यासारख्या कोसळताना पाहून चरकलो. सायकलवर सोमवार पेठेतील घर गाठले. कारण संगमावरून पाणी आमच्या घरात येणार, असा अंदाज होता. मी वहिनी व दोन छोटे पुतण्यांना सायकलवरून शुक्रवार पेठेत पोहचते केले. नंतर ‘सकाळ’ ऑफीसवर आलो, तर न्यूज पेपरचे रीळ पाण्यात तरंगत होते.

तसाच दक्षिणमुखी मारुतीपासून कमरेइतक्या पाण्यातून अप्पा बळवंत चौकात नंतर गुडघाभर पाण्यातून उंबऱ्या गणपती चौकात आलो तर तिथपर्यंत पाणी. नंतर शनिपारापर्यंत पाणी. नव्या पुलावरून पाणी गेल्याने शिवाजीनगरचा संपर्क तुटलेला.

लकडी पूल वाहून गेल्याने जिमखाना बंद. फक्त रेल्वे पुलावरून दुसऱ्या दिवशी संपर्क ठेवता आला. जिमखाना जयहिंद परिसर, डेक्कन पाण्यात. जंगली महाराज रस्ता बुडालेला. नारायण, शनिवार, गावठाण, कसबा, मंगळवार, सोमवार पेठ पाण्यात.

गाडीतळ, मंगळवार हॉस्पिटल पाण्यात. लोक सैरभैर पळत होते. रात्री घरी गेलो तर माझे घरही पाण्यात होते. शाळा, देवळे, धर्मशाळांत लोकांनी कशीबशी रात्र काढली. सकाळ उजाडते तो काय, सर्वत्र चिखल. नदीकाठी प्रेते. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या-गाई-बैल. लोक आपापल्या घरी जाऊन बघतात तर घरे वाहून गेलेली.

या आपत्तीनंतर एकीकडे सर्व शहर पाण्यात असताना पुणेकरांना प्यायला पाणी नव्हते. मेजर व समाजसेवक ग. स. ठोसर यांनी पेशवेकालीन कात्रज तलावाची पाणी योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली. म्युनिसिपल कमिश‍नर, कलेक्टर, मेयर, दक्षिण कमांडचे प्रमुख ब्रिगेडियर यांच्यापुढे ही मागणी त्यांनी मांडली; पण ठोसरांनाच अनेकांनी वेड्यात काढले. शेवटी ब्रिगेडियरने त्यांच्याबरोबर पाहणी केली. ही योजना शक्य आहे, याची खात्री ब्रिगेडियरला पटली. मग लष्करी जवानांच्या साह्याने रात्रीत काम करून तिसऱ्या दिवशी पुण्याला पिण्याचे पाणी पुरविण्यात यश आले. नानासाहेब परुळेकर यांनी पुरात मालमत्तेचे झालेले नुकसान, गरिबांचे उदध्वस्त झालेले संसार याची सचित्र माहिती ‘सकाळ’मध्ये छापून सरकारचे लक्ष वेधले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com