esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा दोन किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

खराळवाडी - मेट्रोच्या कामाचे संग्रहित छायाचित्र.

महापालिका हद्दीतील सुमारे दोन किलोमीटरवरील मेट्रोसाठी बॅलस्टलेस ट्रॅक (लोहमार्ग) पूर्ण झाला आहे. खराळवाडीपासून मेट्रोच्या संत तुकारामनगर स्थानकादरम्यानचे काम प्रारंभीच्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. व्हायाडक्‍टचे काम सुमारे चार किलोमीटर झाल्याने ट्रॅकच्या कामाला वेग आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा दोन किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका हद्दीतील सुमारे दोन किलोमीटरवरील मेट्रोसाठी बॅलस्टलेस ट्रॅक (लोहमार्ग) पूर्ण झाला आहे. खराळवाडीपासून मेट्रोच्या संत तुकारामनगर स्थानकादरम्यानचे काम प्रारंभीच्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. व्हायाडक्‍टचे काम सुमारे चार किलोमीटर झाल्याने ट्रॅकच्या कामाला वेग आला आहे.

महापालिकेच्या हद्दीतील सात किलोमीटरच्या अंतरात या वर्षाच्या अखेरीला ३१ डिसेंबर रोजी मेट्रो धावण्यासाठी व्हायाडक्‍टवरील दोन्ही बाजूचा ट्रॅक बांधण्याचे काम जुलैमध्ये हाती घेण्यात आले. प्रारंभीच्या टप्प्यात खराळवाडी येथील व्हायाडक्‍टचे काम सुरू झाले होते. त्याच भागात ट्रॅकचे बांधकाम सुरू केले. मेट्रोच्या दोन्ही मार्गांचा विचार करता महापालिकेच्या हद्दीत १४ किलोमीटर अंतराचा ट्रॅक करावा लागणार आहे. मेट्रोसाठी खांब व त्यावरील व्हायाडक्‍ट यांचे बांधकाम यासाठी जादा वेळ लागतो. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दहा लेनच्या पुणे-मुंबई महामार्गावर मध्यभागी दुभाजकावर खांब उभारणीचे काम सुरू झाल्याने ते पुणे शहराच्या तुलनेत वेगाने पूर्ण झाले. खांबांवरील व्हायाडक्‍टचे कामही निम्म्यापेक्षा अधिक भागात पूर्ण झाले असल्याने ट्रॅक उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली. ट्रॅकचे काम आणखी थोडेफार झाल्यानंतर सिग्नल बसविण्याचे काम सुरू करण्यात येईल.  

नाशिकफाटा येथे दुहेरी उड्डाण पूल असल्याने तेथे मेट्रोच्या खांबाची उंची जास्त आहे. तेथे वाहतुकही जास्त असल्यामुळे तेथील काम पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. तेथे कासारवाडी रेल्वेस्थानकासमोर तीन मजली मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे. या भागातील खांबाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने तेथील व्हायाडक्‍टच्या कामाला विलंब होईल. सध्या व्हायाडक्‍टचे काम दोन वेगवेगळ्या भागांत झाले आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम करण्यासाठी व्हायाडक्‍टचा सलग टप्पा मिळालेला नाही. येत्या दोन महिन्यांनंतर या कामाला वेग येईल.

loading image
go to top