पुण्यात मेट्रो विस्तारणार ४३ किलोमीटरने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Metro

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे ४३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे.

पुण्यात मेट्रो विस्तारणार ४३ किलोमीटरने

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे ४३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण ६६ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला तर खडकवासला ते खराडी हा २८ किलोमीटरचा मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे.

या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर मध्यंतरी झालेल्या पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटीच्या (पुमटा) बैठकीत शिवाजीनगर ते लोणीकाळभोर दरम्यान पीएमआरडीएने तयार केलेला प्रकल्प अहवाल महामेट्रोने सुधारित करावा. तो करताना खडकवासला ते स्वारगेट आणि एसएनडीटी ते खडकवासला या मार्गाचा समावेश त्यामध्ये करावा. त्याचबरोबरच हडपसर ते सासवड आणि हडपसर ते खराडी या दरम्यानच्या मेट्रो विस्तारीकरणाबाबतचा विचार करावा. हा सुधारित अहवाल तयार करून पुन्हा पुमटापुढे सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गाचे ४३ किलोमीटर विस्तारीकरण करणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यास पुमटाची मान्यता घेऊन तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे होणार शहरात मेट्रोचे जाळे...

  • सुरू असलेले मेट्रोचे काम ५४ किमी

  • मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण ४३ किमी

  • पहिला आणि दुसरा टप्पा ९७ किमी

सध्या सुरू असलेल्या मार्गाचे काम

  • वनाज ते रामवाडी - १५ किलोमीटर (महामेट्रो)

  • पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट - १६ किलोमीटर (महामेट्रो)

  • हिंजवडी ते शिवाजीनगर - २३ किलोमीटर (पीएमआरडीए)

  • सुरू असलेल्या एकूण मेट्रो मार्गांचे काम... - ५४ किलोमीटर

  • विस्तारण्यात येणार मेट्रो मार्ग - ४३ किलोमीटर

Web Title: Metro To Be Extended To Pune By 43 Kms

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneMaha MetroExtended
go to top