मेट्रो भूमिपूजनाच्‍या आधीच सुरू पाहणीचे काम

ज्ञानेश सावंत - @ssDnyaneshSakal
शनिवार, 24 डिसेंबर 2016

पुण्यात मेट्रो होणार...रोज जिवावर उदार होऊन कामावर जाणारे स्कूटर-मोटारसायकलस्वार अन्‌ वाहतूक कोंडीत तासन्‌तास अडकणारे मोटारचालक हे स्वप्न गेली अनेक वर्षे पाहात होते. अखेरीस आज, शनिवारी या स्वप्नाच्या पूर्तीला सुरवात होत असून, नाताळच्या पूर्वसंध्येला सांताक्‍लॉज बनून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांना मेट्रोच्या भूमिपूजनाची भेट देत आहेत...

पुण्यात मेट्रो होणार...रोज जिवावर उदार होऊन कामावर जाणारे स्कूटर-मोटारसायकलस्वार अन्‌ वाहतूक कोंडीत तासन्‌तास अडकणारे मोटारचालक हे स्वप्न गेली अनेक वर्षे पाहात होते. अखेरीस आज, शनिवारी या स्वप्नाच्या पूर्तीला सुरवात होत असून, नाताळच्या पूर्वसंध्येला सांताक्‍लॉज बनून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांना मेट्रोच्या भूमिपूजनाची भेट देत आहेत...

भूमिपूजनाची औपचारिकता होण्याआधीच मेट्रो प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरवात झाली असून, नियोजित महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासूनच मेट्रोच्या दोन्ही मार्गांची प्रत्यक्ष पाहणीकरून कामाचे नियोजन सुरू केले आहे. येत्या महिनाभरात सरकारी आणि महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील कामे हाती घेण्यात येतील आणि त्यानंतर खासगी जागेच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरू होईल. मेट्रोच्या नियोजित स्वारगेट-पिंपरी आणि वनाज-रामवाडी या मार्गांसाठी साधारणत: ४४ हेक्‍टर जागा संपादित करण्यात येणार आहे. त्यात १२ हेक्‍टर खासगी जागेचा समावेश आहे. खासगी जागा घेताना अडथळे निर्माण होऊन वेळ जाण्याची शक्‍यता असल्याने केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील कामांना प्राधान्य देण्यात येऊन त्यावरील कामे लगेचच सुरू करण्यात येतील. नव्या वर्षात म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही कामे हाती घेतली जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.  भूमिगत थांब्यांकरिता मार्ग निश्‍चित करण्याची आणि त्यालगतच्या जमिनींचा दर्जा तपासण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी त्या-त्या खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यात येईल.

मेट्रोचे अधिकारी पुण्यात मुक्कामी
मेट्रोच्या मार्गांवरील कामांचे नियोजन करण्यात येत असले, तरी भूमिपूजनानंतर गती देण्यात येणार आहे. त्याकरिता नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे पथक पुण्यात आले असून, पुढील काही महिने ते पुण्यात राहणार आहे. विशेषत: मेट्रोच्या उभारणीतील अडथळे दूर करण्याची जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे. 

निविदा प्रक्रिया महिन्यात सुरू
मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात येणार आहे. तिची प्रक्रिया झाली असून, त्‍यात केंद्र, राज्‍य सरकार आणि महापालिकेच्‍या प्रतिनिधींचा समावेश असेल. ‘एसपीव्ही’च्या संचालकांच्‍या बैठकीत मेट्रोच्‍या पुढील कामाचे  टप्पे ठरविण्यात येतील. या बैठकांमध्ये निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय होईल. त्यादृष्टीने नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी कामे सुरू केली आहेत. नेमकी निविदा प्रक्रिया, कामाचे स्वरूप, दर आणि कामे पूर्ण करण्याचा कालावधी ठरविण्यात येईल. येत्या महिनाभरात काही कामांसाठी निविदा काढण्यात येतील.

भूसंपादनाचा वेळ वाचणार  
मेट्रोची उभारणी करताना जवळपास १२ हेक्‍टर खासगी मालकीची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे भूसंपादनात अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने खासगी जागेचा वापर टाळण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे भूसंपादन वेळेत होण्याची आशा आहे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

दिलासा मिळाला...

पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ‘मेट्रो’च्या रूपाने आकाराला येत आहे. मेट्रोची प्रतीक्षा असणाऱ्या व सध्या ‘पीएमपी’मधून मेट्रोच्या प्रस्तावित मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ‘मेट्रो’चे स्वागत केले आहे. हे काम विनाविलंब वेळेत पूर्ण करून पुणेकरांना दिलासा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय 
स्वप्ना लोहार (औंध रस्ता) - पीएमपी बससाठी तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागते. कधी बस मिळते, तर कधी ती भरगच्च भरलेली असते. त्यामुळे शहरात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मेट्रो आल्यामुळे हा प्रश्‍न कायमचा सुटेल असे वाटते. कारण पीएमपी बसपेक्षा एक चांगला पर्याय पुणेकरांसाठी आणि खासकरून खडकी भागात राहणाऱ्या लोकांसाठी निर्माण होईल. मेट्रोमुळे नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निर्माण होणार आहे.

वेळ वाचेल आणि प्रवासही सुरक्षित 
विक्रम भिंगारदिवे (रेंजहिल्स) - रेंजहिल्स या भागातून पीएमपी बससेवा सुरू असली, तरी ती बिनभरवश्‍याची आहे. नियोजित वेळेत कधीच बस मिळत नाही. त्यात लोणावळा ते पुणे या लोकलमध्ये कोणत्याही वेळी गर्दी असतेच. कुठेतरी रेंजहिल्सवरून पुण्याकडे जाण्यासाठी कमी पर्याय उपलब्ध आहेत; पण, मेट्रो येणार असल्यामुळे एक चांगला पर्याय आम्हा प्रवाशांसाठी निर्माण झाला आहे. आम्हा प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत आहे. वेळ वाचेल आणि सुरक्षित प्रवासही घडेल.

गर्दीचा त्रास कमी होईल 
नंदू गोगले (दापोडी) - मेट्रोचे आम्ही स्वागतच करतो. पण, मेट्रोला संमती देण्यास एवढा उशीर करणे गरजेचे नव्हते. मेट्रोमुळे दापोडी थेट पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणांशी जोडली जाणार असल्याने लोकलच्या गर्दीचा त्रास सहन करावा लागणार नाही. शहराला स्मार्ट सिटी बनवताना मेट्रोसारख्या सेवेची नितांत गरज होती. ती सरकारच्या प्रयत्नांनी पूर्ण झाली. देशात पुणे मेट्रो सिटी होणार असल्याचा आनंद असून, ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, असे वाटते.

मेट्रो लोकांच्या फायद्याची 
जॉन लोकनाथन (बोपोडी) - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा भाग तसा महापालिकेच्या अखत्यारित येत नसला, तरी मेट्रोमुळे तो जोडला जाणार आहे. पीएमपी, रिक्षा, लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांपेक्षाही मेट्रो नक्कीच लोकांच्या फायद्याची ठरणार आहे, यात शंका नाही. कारण पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा चौथा पर्याय निर्माण होणार असून, भूमिपूजनाचे राजकारण करण्यापेक्षा मेट्रोचे काम जलदगतीने करा. खडकी, दापोडी, बोपोडी आणि रेंजहिल्स या भागांना मेट्रोत समाविष्ट केल्याचे समाधान आहे.

महिलांसाठी स्वतंत्र डबा हवा 
ईशानी कोल्हटकर (सदाशिव पेठ) - लोकांना परवडेल असे मेट्रोचे तिकीट पाहिजे. मेट्रोमुळे पीएमपी बसपेक्षा प्रवासाचा कालावधी कमी आणि ही सेवा नक्कीच खासकरून महिलांसाठी सुरक्षित व सोयीची ठरेल, यात शंका नाही. मेट्रो येणार असल्यामुळे पुणे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करते आहे, याचा मला अभिमान वाटतो. मेट्रोमध्ये रेल्वेसारखाच महिलांसाठी स्वतंत्र डबा असावा. 

प्रदूषण कमी होण्यास मदत 
रोहन काळे (स्वारगेट) - पुण्यात मेट्रोमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. लवकर पोचण्यास मदत होईल. वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता वाटते. पण मेट्रो ही काळाची गरज असून, ती सक्षमपणे पुण्यात राबवली पाहिजे. पुण्याचा विकास साधायचा असेल, तर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरू व्हायला हवा. यामुळे प्रवाशांची तारांबळ थांबेल. 

मेट्रोचे राजकारण करू नये 
नकुल गोडबोले (शिवाजीनगर) - मेट्रोमुळे प्रवास करण्यासाठी बस व रिक्षाच्या निम्म्या वेळेत पोचू शकतो. मेट्रोमुळे बाकीच्या वाहनापेक्षा ध्वनी प्रदूषण कमी होईल. जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी, असे मला वाटते. या निर्णयाचे मी स्वागतही करतो. फक्त मेट्रो राजकारण करू नका.

Web Title: Metro work watching