म्हसवे गट विश्लेषण
म्हसवे जिल्हा परिषद गटात काटे की टक्कर
मानकुमरे-शिंदे गट आमनेसामने; शिवसेनेमुळे तिरंगी लढतीचे संकेत
भाऊसाहेब जंगम ः सकाळ वृत्तसेवा
हुमगाव, ता. २३ : जावळी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या म्हसवे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे बिगुल वाजले असून, याठिकाणी ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. भाजपने अनुभवी नेते आणि माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना कुणबी दाखल्यावर पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी या गटात मानकुमरे यांचा वारू रोखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने म्हसवे गटातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.
वसंतराव मानकुमरे यांनी यापूर्वी दोनदा या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्याविषयी गटात काही प्रमाणात नाराजी असली, तरी भाजपकडे सक्षम पर्यायाची कमतरता आणि मानकुमरेंचा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावरच पुन्हा विश्वास टाकला आहे. दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी हुमगाव येथील मेळाव्यातच ही निवडणूक ताकदीने लढण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सचिन गोगावले यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने आता राष्ट्रवादीला अशोक चव्हाण किंवा शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांपैकी एकाला ताकद द्यावी लागणार आहे.
या निवडणुकीत धरणग्रस्तांनी संतोष शिराळे यांना रिंगणात उतरवून प्रस्थापितांपुढे आव्हान उभे केले आहे. शिराळे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्यास या गटात तिरंगी लढत पाहायला मिळेल. लाभधारक आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, ओबीसी समाजातील नाराजी आणि भाजपमधील निष्ठावंतांची भूमिका मानकुमरे यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. मात्र, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची मतदारसंघावर असलेली पकड ही मानकुमरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. जिल्हा परिषदेसोबतच दोन्ही पंचायत समिती गणांमध्येही तगडी लढत पाहायला मिळत आहे. भाजपने सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांच्या पत्नी रेश्मा पोफळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आमदार शिंदे यांच्या कुटुंबातील उच्चशिक्षित उमेदवार शिल्पा शिंदे यांना मैदानात उतरवून थेट आव्हान दिले आहे. हुमगाव, आखाडे, इंदवली यांसारख्या गावांत शिंदे समर्थक मोठ्या संख्येने असल्याने येथे चुरस वाढली आहे. भाजपने सर्व जुन्या नावांना बाजूला सारून गोरख महाडिक या नवख्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने माथाडी नेते विठ्ठल गोळे यांना उमेदवारी दिली आहे. गोळे हे स्थानिक उमेदवार असल्याने भाजपला या गणात मोठा कस लावावा लागणार आहे.
चौकट
निकालाचा कौल कोणाकडे?
भाजपचे संघटन आणि शिवेंद्रसिंहराजेंची ताकद एका बाजूला, तर आमदार शशिकांत शिंदेंची रणनीती आणि धरणग्रस्तांचा रोष दुसऱ्या बाजूला, अशा कात्रीत म्हसवे गटाचे राजकारण अडकले आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार, याकडे आता संपूर्ण जावळी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
फोटो - मानकुमरे, अशोक चव्हाण, संदीप पवार, शिल्पा शिंदे, रेश्मा पोपळे, विठ्ठल गोळे, गोरख महाडिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

