हळदीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर तंत्रज्ञानावर मंगरुळ येथे आद्य रेषा प्रात्यक्षिके

हळदीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर तंत्रज्ञानावर मंगरुळ येथे आद्य रेषा प्रात्यक्षिके
Published on

हळदीतील सूक्ष्म अन्नद्रव्य वापर
तंत्रज्ञानावर मंगरुळ येथे आद्यरेषा प्रात्यक्षिके

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत कोझिकोड (केरळ) येथील भारतीय मसाला पिके संशोधन संस्थेने हळद पिकासाठी विकसित केलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाच्या वापर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी परभणी कृषी विज्ञान केंद्रातर्फे मानवत तालुक्यातील मंगरुळ येथे आद्यरेषा पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत.

हळदीसाठी विकसित केलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाच्या वापर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी देशातील विविध कृषी विज्ञान केंद्रांमार्फत आद्यरेषा पीक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. परभणी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील निवडक हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर ही प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत.

मंगरुळ बुद्रुक (ता. मानवत) येथील हळद उत्पादक शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा, योग्य वापराची वेळ आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ अमित तुपे म्हणाले, की हळद पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांसोबतच झिंक, बोरॉन, लोह, मँगनीज आणि तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटणे, पानांवर पिवळेपणा येणे, कंदांची वाढ कमी होणे तसेच उत्पादन आणि गुणवत्तेत घट होणे अशा समस्या निर्माण होतात.

सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाचा शिफारशीनुसार वापर केल्यास पिकाची वाढ जोमदार होते, प्रकाशसंश्लेषणाची कार्यक्षमता वाढते, कंदांचा आकार व वजन सुधारते आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

आद्यरेषा पीक प्रात्यक्षिकाच्या संपूर्ण कालावधीत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नियमित शेतभेटी देऊन पिकाच्या वाढीचे निरीक्षण करणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार तांत्रिक मार्गदर्शन, पीक संरक्षण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक शिफारशी देण्यात येणार आहेत.

छायाचित्र ओळ :
परभणी : कृषी विज्ञान केंद्रातर्फे मंगरुळ (ता. मानवत) येथील शेतकऱ्यांना हळद पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्य वापर तंत्रज्ञानाच्या आद्यरेषा पीक प्रात्यक्षिकांतर्गत सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणांचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेषज्ञ अमित तुपे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com