Farming Technology : अत्याधुनिक शेतीतंत्रासाठी मायक्रोसॉफ्ट बारामतीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Microsoft Baramati farming technology Establishment of Centre of Excellence on FarmVibes  Organization of agricultural exhibition

Farming Technology : अत्याधुनिक शेतीतंत्रासाठी मायक्रोसॉफ्ट बारामतीत

पुणे : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शेतीतंत्र विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सरसावले असून, बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून ‘सेंटर फॉर एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ स्थापना करण्यात आली आहे.

मंगळवारी (ता.३) कृषिक प्रदर्शनात त्याचे अधिकृत अनावरण करण्यात येणार आहे. नवी पेठेतील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी या संबंधीची माहिती दिली.

ते म्हणाले,‘‘ट्रस्ट, बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने यंदाचे कृषिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

मंगळवारी जरी उद्घाटन झाले तर सर्व शेतकऱ्यांसाठी १९ ते २२ जानेवारी याकाळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. त्या आधी संशोधकांची चर्चासत्रे, व्याख्याने, प्रयोग आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

’’ प्रदर्शनाचे उद्घाटन मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे विश्वस्त आणि सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. प्रशांतकुमार पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

मायक्रोसॉफ्टच्या मायक्रोसॉफ्ट अझूर या मंचावर फार्मव्हाइब्ज आय हा तंत्रज्ञान संच आहे. बारामती परिसरातील वीस वर्षांतील शेतीसंदर्भात हवामान, माती, पाणी आदींबाबतचा विदा मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डला उपलब्ध करून देण्यात येईल.

त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर, उपग्रहावर आधारित तंत्रज्ञानाद्वारे भविष्यातील अत्याधुनिक शेती तयार करण्यात येईल. या तंत्रज्ञानाचा थेट शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे.