मायक्रोसॉफ्टची सेवा जगभरात ठप्प कोलमडली

मायक्रोसॉफ्टची सेवा जगभरात ठप्प कोलमडली
Published on: 

शिकागो, ता.१३ (पीटीआय) : जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आउटलुकसह कंपनीच्या अनेक ॲप्समध्ये अडचणी निर्माण झाल्याने हजारो जगभरातील वापरकर्त्यांना सुमारे १५ तासांहून अधिक काळ ई-मेल खाते वापरण्यात तसेच अन्य सेवा मिळविण्यात अडथळे आले.
तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी कंपनीने केलेले विविध प्रयत्न आणि बदल अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कंपन्यांचे कामकाज, सरकारी कार्यालयांचे व्यवहार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री साडेबारानंतर सेवा ठप्प झाल्याची माहिती देणाऱ्या ‘डाऊनडिटेक्टर’ या संकेतस्थळावर सुमारे एक लाख ३० हजार वापरकर्त्यांनी ‘आउटलुक’ वापरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर तक्रारींची संख्या कमी झाली असली, तरी अनेकांना ई-मेल पाठविता किंवा प्राप्त करता येत नव्हते. काही वापरकर्त्यांना मेल उघडण्यातही अडचणी येत होत्या. मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयीन संदेशवहन ॲप ‘टीम्स’, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सहाय्यक ‘कोपायलट’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट ३६५’ या सेवांमध्येही अडथळे येत असल्याच्या तक्रारी हजारो वापरकर्त्यांनी अडचणी नोंदविल्या. विशेषतः ई-मेल आणि ‘टीम्स’ ॲपशी संबंधित तांत्रिक बिघाडाची सुरू असल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले.
मायक्रोसॉफ्टचे मुख्यालय वॉशिंग्टनमधील रेडमंड येथे आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनांत म्हटले आहे की, अमेरिकेतील विविध भागांतील वापरकर्त्यांना ‘एक्स्चेंज ऑनलाइन’ मेलबॉक्स वापरताना अडचणी येत असल्याची माहिती कंपनीला मिळाली आहे. कंपनीच्या पायाभूत सुविधांमधील एका भागावर अपेक्षेपेक्षा अधिक भार पडत असल्याने संपर्क यंत्रणेत त्रुटी निर्माण होत असाव्यात. स्वयंचलित आरोग्य तपासणीदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे काही सर्व्हर अनपेक्षितपणे बंद पडल्याचेही कंपनीच्या निदर्शनास आले, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले.

‘सायबर हल्‍ल्याची शक्यता नाही’
मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी उपाध्यक्ष चार्ल्स लामाना यांनी या तांत्रिक बिघाडामागे कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्याचे किंवा घातपाती कृत्याचे संकेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सेवांमधील बिघाडावर मात करण्यासाठी कंपनीचे अभियंते पर्यायी कार्यप्रणाली विकसित करण्यावर काम करत आहेत. मात्र, सर्व सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत मायक्रोसॉफ्टने अद्याप निश्चित कालमर्यादा जाहीर केलेली नाही. ‘सेवांवरील परिणाम कमी करण्यासाठी आम्ही सर्व शक्य मार्गांनी वेगाने प्रयत्न करत आहोत,’ असे ‘मायक्रोसॉफ्ट ३६५ स्टेटस’ या खात्यावरून ‘एक्स’वर सांगण्यात आले.

सरकारी सेवांवर परिणाम
या तांत्रिक बिघाडाचा परिणाम सरकारी सेवांवरही स्पष्टपणे दिसून आला. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र आणि व्यापार विभागाने तातडीच्या चौकशीसाठी दूरध्वनी यंत्रणेचा वापर करण्याचे आवाहन केले. तर, ई-मेल सेवा विस्कळित झाल्यामुळे आयातीसंदर्भातील संदेशवहनावर परिणाम होत असल्याचा कृषी विभागाने सांगितले. या तांत्रिक बिघाडामुळे देशाच्या सरकारी माहिती-तंत्रज्ञान पायाभूत सुविधांवर परिणाम झाल्याचे जपानचे उपमुख्य मंत्रिमंडळ सचिव मसानाओ ओझाकी यांनी स्पष्ट केले.

भारतीय विमान कंपन्यांवर परिणाम
या जागतिक तांत्रिक बिघाडाचा परिणाम भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावरही झाला असून, विमान कंपन्यांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. एअर इंडियाची विमानसेवा पूर्णपणे सुरळीत सुरू असून, संदेशवहनाची यंत्रणाही सुरक्षित असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ई-मेल सेवा तात्पुरती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांचे संदेश कोणत्याही अडथळ्याविना पोहोचू शकतील. दूरध्वनी, ‘एआय’ आणि सोशल मीडियाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा पूर्णपणे कार्यरत असल्याचे एअर इंडियाने सांगितले.
जागतिक तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोची ई-मेलद्वारे मदत सेवा विस्कळित झाली आहे. ग्राहकांकडून ई-मेल प्राप्त करण्यात अडचणी येऊ शकतात, असे कंपनीने सांगितले. तातडीच्या मदतीसाठी प्रवाशांनी कंपनीच्या संकेतस्थळावर किंवा ॲपवर उपलब्ध असलेल्या ‘६ई स्काय’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साहाय्यकाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अकासा एअरची ई-मेल सेवेवरही परिणाम झाला असून, संदेशांना प्रतिसाद देण्यास विलंब लागत होता. प्रवाशांनी २४ तास उपलब्ध असलेल्या अकासा केअर सेंटरशी किंवा सोशल मीडियाद्वारे संपर्क साधावा, असा सल्ला विमान कंपनीने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.