आर आर आबांनी सांगितलं होतं; 'पायात चप्पल नसलेल्याला पवारसाहेबांनी उपमुख्यमंत्री केले'

Milind Shangai Writes about R R patil speech in Baramati
Milind Shangai Writes about R R patil speech in Baramati

बारामती : गरिबी किती क्लेशकारक असते, हे मी अनुभवले आहे, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कपडे घालत नाहीत, परंतु माझ्याकडे कपडेच नसल्याने त्यांचे कपडे घालण्याची वेळ माझ्यावर आली, कमवा आणि शिका योजनेत मातीच्या पाट्या डोक्यावरुन वाहून पैसे मिळविले, त्यात बहिणीचे व स्वताःचे शिक्षण केले. वक्तृत्व स्पर्धेत मिळणा-या बक्षीसांचे, रोजंदारी काम न करता मिळणा-या पैशांचे तेव्हा आकर्षण होते, अशा स्पर्धातूनच मी तयार होत गेलो. ज्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य झालो, त्या दिवशी शाळेच्या पडवीतच झोपलो होतो. जिल्हा परिषद सदस्य झालो त्या दिवशी पायात चप्पल आली. सत्य तेच बोलायचे हे ध्येय ठेवून काम करत राहिलो, एक अत्यंत सामान्य मुलगा या राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकतो हेच यातून दिसले...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे बारामतीत झालेले हे भाषण अजरामर असेच ठरले. शारदा व्याख्यानमालेत 3 मे 2007 रोजी आबांनी बारामतीकरांसमोर केलेल्या भाषणाने अनेकांना आपले अश्रू आवरता आले नव्हते. अत्यंत ओघवत्या शैलीत त्यांनी आपला जीवनपटच बारामतीकरांपुढे उभा केला होता. आज आबांच्या जयंतीच्या दिवशी अनेक बारामतीकरांना आबांच्या त्या अजरामर भाषणाची आठवण झाली. 

आबा जे खडतर जीवन जगले ते त्यांच्याच तोंडून कसलीही अतिशोयक्ती किंवा बडेजाव न मिरवता ऐकताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. राजकारणात येऊनही कोणत्याही कंत्राटदाराचे मिंधे झालो नाही, हे मोठ्या अभिमानाने त्यांनी नमूद केले. वडीलांच्या मृत्यूनंतर शिक्षण पूर्ण करावे, या साठी आबांच्या आईने आग्रह धरला होता. वक्तृत्व चांगले असल्याने स्पर्धा जिंकत गेलो, नंतर जिल्हा परिषदेला उमेदवारीची संधी मिळाली, त्या वेळी पायात चप्पलही नव्हती, निवडणूकीत निवडून येईल असे वाटलेही नव्हते पण गरीबाच्या पोरावर जनतेने विश्वास दाखवला आहे, काम केले नाही तर लोक कधीच माफ करणार नाहीत, या एकाच भावनेने त्यांनी काम केले. त्या काळात तब्बल 11 वर्षे जिल्हा परिषदेच्या निवडणूकाच न झाल्याने ते अकरा वर्षे सदस्य राहिले. 
याच काळात शरद पवार यांचे लक्ष आर.आर. पाटील यांच्याकडे गेले. त्यांनी या युवा नेत्यातील गुण हेरले आणि त्यांना थेट विधानसभेचे तिकीट देत आमदारही केले. ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यावर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, यशवंत ग्रामसमृध्दी योजना असे महत्वाकांक्षी कार्यक्रम त्यांनी राबवले. 

हे धाडस फक्त पवारसाहेबच करु शकतात...
ज्या मुलाच्या पायात चप्पलही नव्हती त्याला आमदार करुन उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवण्याचे धाडस फक्त शरद पवार साहेबच करु शकतात, अशी भावना आबांनी या भाषणात भावुक होऊन बोलून दाखवली होती. डान्सबारबंदी, पोलिसांची पगारवाढ, भरतीतील गैरप्रकार थांबवणे, दरोड्यांचा तपास, भ्रष्टाचार कमी करणे अशा अनेक गोष्टी हाताळतांना पवारसाहेबांची खंबीर साथ माझ्यासोबत होती, हे त्यांनी भाषणात नमूद केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com