esakal | ऑइल कंपन्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol-Diesel

ऑइल कंपन्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा (Corona) फटका सर्वच क्षेत्रांना बसला असताना तिन्ही ऑइल कंपन्यांना मात्र गेल्या आर्थिक वर्षात तीनशे ते सोळाशे पट नफा झाला असल्याचे समोर आले आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असताना, या कंपन्या मात्र खिसे भरत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने (sajag nagrik manch) केला आहे. (Millions flights oil companies)

मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीवरून ही गोष्ट समोर आली आहे. पाच राज्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पेट्रोल-डिझेलचे स्थिर असलेले भाव गेल्या अडीच महिन्यांपासून परत वाढू लागले आहे. हे दर ऑइल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या किमती व डॉलरच्या किमतीप्रमाणे ठरवतात, असे केंद्र सरकारकडून सांगितले जाते. परंतु निवडणूक काळात हे दर कसे स्थिर राहतात, त्याचे कोडे सुटत नाही. सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत असलेल्या किमती बघून तिन्ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे जाहीर झालेले २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे निकाल पाहिले ते धक्कादायक आहेत, असे वेलणकर म्हणाले.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीने २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागील वर्षीच्या पेक्षा १६०० टक्के नफा जास्त कमावला (१ हजार ३१३ कोटी रुपयांवरून २१ हजार ८३६ कोटीवर) आहे. तसेच भागधारकांना १२० टक्के लाभांश दिला आहे. भारत पेट्रोलियम या कंपनीने २०२०-२१ या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीपेक्षा ६१० टक्के म्हणजे २ हजार ६८३ कोटी रुपयांवरून १९ हजार ४१ कोटी रुपये नका कमवला आहे. तर भागधारकांना ७९० टक्के लाभांशही दिला. एचपीसीएल या कंपनीने २०२०-२१ या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या पेक्षा ३०० टक्के म्हणजे २ हजार ६३७ कोटी रुपयांवरून १० हजार ६६४ कोटी नफा कमविला आहे. भागधारकांना २२७.५ टक्के लाभांश ही दिला. या कंपनीने शेअर परत करण्यासाठी तब्बल ८८५ कोटी रुपये खर्चही केला आहे, असे वेलणकर यांनी सांगितले.

loading image