‘अकोट''ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमआयएम अलर्ट

‘अकोट''ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमआयएम अलर्ट

Published on

एमआयएमचा एकही नगरसेवक बाहेर पडणार नाही
असदुद्दीन ओवेसी ; ‘अकोट’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षाकडून दक्षता
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १७ ः महापालिका निवडणुकीत एमआयएमने राज्यभरातील महापालिकांमध्ये चांगले यश मिळवले. या पक्षाचे १२५ नगरसेवक विविध ठिकाणी निवडून आले. एमआयएमच्या चिन्हावर निवडून आलेले सर्व नगरसेवक पक्षासोबतच राहतील. एकही नगरसेवक बाहेर पडणार नाही, यासाठी पक्षाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
हैदराबाद येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ओवेसी म्हणाले, की महाराष्ट्रातील विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमच्या १२५ उमेदवारांना विजयी करून जनतेने कौल दिला आहे, त्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे आभार. दरम्यान, ओवेसींच्या पत्रकार परिषदेनंतर प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देताना फर्मान सोडले. यात ते म्हणाले, की नवनिर्वाचित नगरसेवकांनी मला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय परस्पर घेऊ नये. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीपद असो, की मग स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया, यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो पक्ष पातळीवर घेतला जाईल. नगरसेवकांनी आपले प्रस्ताव किंवा भूमिका प्रथम स्थानिक नेते आणि त्यांच्यामार्फत हैदराबादला पाठवावेत. त्यावर संबंधित नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले.
--
नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये एमआयएमचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आले होते. परंतु, स्थानिक पातळीवर पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवत विदर्भातील अकोट आणि बीड जिल्ह्यातील परळीमध्ये तेथील नगरसेवकांनी स्थानिक आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे अकोटमध्ये पाचही नगसेवकांवर एमआयएमने पाच वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. परळीत पक्षाच्या आदेशानंतर संबंधित नगरसेवकांना या स्थानिक आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते.
--
निर्वाचितांचा काफिला हैदराबादला जाणार
नगरपालिका, नगरपंचायत आणि आता महापालिका निवडणुकीत एमआयएमला मोठे यश मिळाले. आता ओवेसी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी लवकरच नगरपालिकेतील शंभर आणि महापालिकेत निवडून आलेल्या १२५ अशा सगळ्या नगरसेवकांना घेऊन हैदराबादला जाणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com