हुल्लडबाजांनी घेतली हिरावून जीवनाची दृष्टी

अनंत काकडे
बुधवार, 16 मे 2018

चिखली - हुल्लडबाजी किती टोकाला जाते, त्यातून एखाद्या निष्पाप व्यक्तीचे जीवन कसे उद्‌ध्वस्त होते, यांची कल्पनाही हुल्लडबाजांना नसते. असाच दुर्दैवी प्रकार मूळचा नेपाळचा रहिवासी असलेल्या मीन बहादूर तिलकसिंग बंब (वय ५५) यांच्या पदरी आला आहे. आपली नोकरी सांभाळताना हुल्लडबाजीला रोखणाऱ्या मीन यांना आपली दृष्टी गमवावी लागली.

चिखली - हुल्लडबाजी किती टोकाला जाते, त्यातून एखाद्या निष्पाप व्यक्तीचे जीवन कसे उद्‌ध्वस्त होते, यांची कल्पनाही हुल्लडबाजांना नसते. असाच दुर्दैवी प्रकार मूळचा नेपाळचा रहिवासी असलेल्या मीन बहादूर तिलकसिंग बंब (वय ५५) यांच्या पदरी आला आहे. आपली नोकरी सांभाळताना हुल्लडबाजीला रोखणाऱ्या मीन यांना आपली दृष्टी गमवावी लागली.

रत्नागिरीत आंब्याच्या शेतात रखवालदार असलेले मीन बहादूर बंब यांनी नशापान करण्यासाठी आलेल्या सहा जणांच्या टोळक्‍याला शेतात येण्यास मज्जाव केला. शेतात बसून नशापान करण्यास मज्जाव केल्याचा राग धरून त्या हुल्लडबाज टोळक्‍याने बंब यांना जबर मारहाण केली. त्यात बंब यांचे दोन्ही डोळे फोडण्यात आले. अनेक ठिकाणी उपचारासाठी मदत मागितल्यानंतर अखेर त्यांना रुपीनगर येथील किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य यांनी आधार दिला. त्यांच्यावर तीन महिने विविध ठिकाणी उपचार केले; परंतु त्याचा उपयोग न झाल्याने त्यांना कायमस्वरूपी आपली दृष्टी गमवावी लागली. दरम्यान, वैद्य यांनी चिंचवड येथील सुधीर कारंडे यांनी फेसबुक आणि फोनच्या माध्यमातून नेपाळमधील रहिवाश्‍यांशी संपर्क साधून बंब यांना नेपाळ येथील कुटुंबाकडे सुखरूप पोच केले. 

आपली दुर्दैवी कहाणी सांगताना बंब म्हणाले, ‘‘गरीब परिस्थिती असल्याने काही काम धंदा मिळेल व जगणे सुखकर होईल, या अपेक्षेने भारतात आलो. शिक्षण नसल्याने नोकरी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर रत्नागिरी येथे एका आंबा बागाईतदाराने शेतात राखणदारी करण्याचे काम दिले. सगळे काही व्यवस्थित सुरू होते. तीन महिन्यांपूर्वी दुपारच्या वेळी नशापान करण्यासाठी सहा जणांचे टोळके शेतात आले. त्यांनी आंब्याच्या बागेत दारू पिऊन हुल्लडबाजी करण्यास सुरवात केली. त्या वेळी या टोळक्‍याला शेतातून हुसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. एकाने लाकडी दांडक्‍याने डोळे फोडले. त्यामुळे बेशद्ध पडलो.

त्यानंतर काय घडले ते कळाले नाही. एका सामाजिक संस्थेमार्फत कोल्हापूरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी याचना करूनही मदत मिळाली नाही. तळवडे येथील किनारा वृद्धाश्रमात आधार मिळाला. किनाराच्या संचालिका प्रीती वैद्य यांनी तीन महिने उपचार केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. 

दरम्यान, दृष्टी गेल्याने आणि मार लागल्याने त्यांना बोलनेही मुश्‍कील होत होते. किनाराच्या संचालिका आणि चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर कारंडे यांनी नेपाळी व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एक महिन्यानंतर मीन बहादूर यांच्या भावाशी संपर्क झाला. संपर्क होत नसलेल्या भावाला पाहून मीन बहादूर यांच्या भावाला अश्रू अनावर झाले. दोघे भाऊ नेपाळ येथे आपल्या घरी पोचले. परंतु, अंधत्व आणि अपंगत्व आल्याने कुटुंबाची जबाबदारी असताना बंब आता कोणतेच काम करू शकत नाहीत. त्यात बंब यांची काय चूक, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहात नाही.

Web Title: min bahadur bumb beating blind crime