मंत्री भरणे यांचे इंदापुरातील लाॅकाडाउनबाबत मोठे विधान

राजकुमार थोरात
Sunday, 6 September 2020

लॉकडाउन नको असेल तर प्रशासनाचा आदेश, सुचना पाळा.
काळजी घ्या, बेजबाबदारपणाने वागू नका : दत्तात्रय भरणे

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ११०० च्या जवळ पोहचली आहे. नागरिकांनी शासनाच्या आदेश व सुचनांचे पालन न केल्यास नाईलाजाने संपूर्ण तालुकाच लॉकडाऊन करावा लागणार असल्याचा इशारा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिला.

इंदापूर तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने भरणे यांनी व्हिडिओद्वारे नागरिकांना संदेश दिला आहे. भरणे यांनी सांगितले की, तालुक्यातील नागरिकांनी लाॅकडाऊनच्या काळामध्ये सर्वांनी सहकार्य केल्यामुळे कोरोनाला रोखू शकलो. मात्र अनलॉक झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली.आज तालुक्यामध्ये १०८२ रुग्ण कोरोना रुग्ण असून ४७२ रुग्णावर उपचार सुरु  आहेत. ५६८ रुग्णावरती यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडले आहे. ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. 

नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी मात्र बेजबाबदारपणे वागू नये. बेजबाबदारपणा कुंटूबासाठी, गावासाठी घातक आहे. प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क वापरा, साबणाने हात धुवा. शक्यतो गर्दी जाण्याचे टाळा, वयोवृद्ध नागरिकांना व लहान मुलांना घराबाहेर पाठवू नका. कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मास्क न वापरणाऱ्यावर कडक कारवाई  करण्याचे आदेश दिले आहेत. जर येणाऱ्या काळामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत गेल्यास तालुका लॉकडाऊन करावा लागले. लॉकडाऊन करायचे नसेल तर राज्य शासनाच्या व प्रशासनाच्या सुचनांचे व  आदेशाचे पालन करण्याचे आवाहन भरणे यांनी केले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Bharne warns of lockdown in Indapur