esakal | जुन्नरच्या लेण्या ‘बुद्धिस्ट सर्कीट’मध्ये?
sakal

बोलून बातमी शोधा

अंबिका लेणी समूह

जुन्नरच्या लेण्या ‘बुद्धिस्ट सर्कीट’मध्ये?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : केंद्र सरकारच्या ‘बुद्धिस्ट सर्किट योजनेत जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, तुळजा, लेण्याद्री या लेणी समूहाचा समावेश करण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पर्यटन संचालकांचा अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे.

जुन्नर शहरापासून काही अंतरावर शिवनेरी, तुळजा, सुलेमान, मानमोडी या गटात विभागलेल्या २२० लेण्यांचा समूह आहे. या लेणी समूहाचा विकास केल्यास बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी व परदेशी पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र आणि पर्यटनस्थळ होऊ शकते, या भूमिकेतून या लेणी समूहाचा केंद्र सरकारच्या ‘बुद्धिस्ट सर्किट योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पर्यटनमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पर्यटन संचालनालयाच्या संचालकांकडे अभिप्राय मागविला आहे. पर्यटन संचालकांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे रीतसर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुण्याच्या दक्षिण भागातील पाणी पुरवठ्यामध्ये बदल

दोन हजार वर्षांपूर्वीचा ठेवा

सातवाहन साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या जुन्नर शहराजवळ दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वाधिक बौद्ध लेण्या कोरल्या होत्या. हा लेण्यांचा समूह आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एएसआय) अखत्यारित आहे. या लेण्यांच्या अभ्यासासाठी देश-विदेशातून अभ्यासक व पर्यटक येत असतात.

जुन्नर पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आहे. तालुक्यात पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, लेणी समूहाचा ‘बुद्धिस्ट सर्कीट’मध्ये समावेश करण्यासाठी केलेला प्रयत्न हा त्याचा एक भाग आहे. सर्व स्तरांवर पाठपुरावा करणार आहे.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

loading image