अल्पवयीन मुलांनी भर रस्त्यात केलेल्या खूनामुळे बारामतीकर सुन्न्.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

अल्पवयीन मुलांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष, सोशल मिडीयाचा मुलांकडून वाढलेला वापर, किरकोळ कारणावरुन राग डोक्यात धरुन ठेवण्याची सवय, यामुळे बारामतीत एका निष्पाप व्यक्तीला प्राणांना मुकावे लागले.

अल्पवयीन मुलांनी भर रस्त्यात केलेल्या खूनामुळे बारामतीकर सुन्न्....

बारामती - अल्पवयीन मुलांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष, सोशल मिडीयाचा मुलांकडून वाढलेला वापर, किरकोळ कारणावरुन राग डोक्यात धरुन ठेवण्याची सवय, यामुळे बारामतीत एका निष्पाप व्यक्तीला प्राणांना मुकावे लागले.

बारामतीत काल संध्याकाळी कवि मोरोपंत शाळेनजिक तीन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शशिकांत बाबासाहेब कारंडे (वय 47, रा. बारामती) यांचा मृत्यू झाला. अवघ्या सोळा वर्षांच्या तीन मुलांनी दोन कोयते व कु-हाडीने तब्बल अठरा वार करत शशिकांत यांची निर्घृण हत्या केली. या मुलांचा आवेश पाहून त्यांना थांबविण्याची कोणाचीच हिंमत झाली नाही. भर रस्त्यात चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने अल्पवयीन मुलांनी केलेला हा हल्ला बारामतीकरांना सुन्न करणारा ठरला.

शशिकांत कारंडे यांच्या मुलावर याच तिघांनी काही महिन्यांपूर्वी हल्ला केला होता. त्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा राग या तिघांच्या मनात होता. यातिघांपैकी एकाच्या मैत्रीणीशी कारंडे यांचा मुलगा बोलतो असा त्याला संशय़ होता, त्या वरुन त्याने दमदाटीही केलेली होती. शशिकांत कारंडे हेही आपल्या मुलाला पाठीशी घालत आहेत, असा संशय त्यांना होता. त्या वरुन अत्यंत थंड डोक्याने नियोजनबध्द रित्या कोयता व कु-हाडीने एखाद्या चित्रपटात शोभावे अशा पध्दतीने या तिन्ही अल्पवयीन मुलांनी शशिकांत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की त्यातून ते उठूच शकले नाहीत. त्यांच्यावर तब्बल अठरा वार झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले.

शहर पोलिसांनी या तिन्हीही अल्पवयीन मुलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक सुनील महाडीक या बाबत पुढील तपास करीत आहेत.

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवे

आपली मुले दिवसभर काय करतात, त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलचा वापर ते कशा पध्दतीने करतात, त्यांच्यासोबत कोण असते, ते कोणत्या गुन्हेगारी स्वरुपाच्या मुलांशी मैत्री करत नाहीत ना, कशा पध्दतीने ते खर्च करतात, या सर्वांची माहिती आई वडीलांनी ठेवायला हवी. मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांनी वेळ द्यायला हवा.

- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

सोशल मिडीयाचा अतिरेक थांबवायला हवा

सोशल मिडीयाचा अतिरेक युवा पिढीच्या नसात भिनला असून आता त्यातून या पिढीला बाहेर काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मिडीयावर प्रसिध्दी मिळविण्यासाठी व आपल्या परिसरात दबदबा निर्माण व्हावा या साठी थंड डोक्याने हा खून झाला आहे. ही घटना सामाजिकदृष्टयाही सुन्न करणारी असून पालकांनी आपल्या मुला मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या मुलांचे मित्र कोण, ते कोणासोबत वावरतात, त्यांचा दिनक्रम कसा असतो, मोबाईल किती वेळ वापरतात या सह मुलांशी सशक्त संवाद साधणे गरजेचे आहे.

- मिलिंद मोहिते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती.

Web Title: Minor Childrens Murder Crime Baramati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..