कऱ्हाडच्या बालकाच्या मृत्यूचा चौकशी अहवाल द्या

कऱ्हाडच्या बालकाच्या मृत्यूचा चौकशी अहवाल द्या
Published on

बालक मृत्यूचा चौकशी अहवाल द्या

बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

कऱ्हाड, ता. १३ : येथील क्रांतिवीर माधवराव जाधव बालनिरीक्षण गृहातील अल्पवयीन बालकाला मारहाण झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश देत त्याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे स्प‍ष्‍ट केले आहे.
चौकशीत बालकास झालेली मारहाण, घटनेची नेमकी कारणे, संबंधित व्यक्ती, अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका, बालगृहातील सुरक्षा व देखरेख व्यवस्था, सीसीटीव्ही फुटेज, बालकाच्या उपचारासंदर्भातील कार्यवाही व घटनेनंतर प्रशासन तसेच पोलिसांकडून केलेली कार्यवाहीचा सविस्तर तपास करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. या प्रकरणात घटनेला सुमारे १५ दिवस उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या बाबीचीही चौकशी करून गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला, त्याची कारणमीमांसा अहवालात स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, कर्तव्यातील कसूर, त्रुटी किंवा बालकांच्या हक्कांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा व्यक्तींविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
...........................
विलंबावर बोट
घटनेला तब्बल १५ दिवस उलटूनही या प्रकरणात पोलिसांत अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? यावर आयोगाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विलंबामागची कारणमीमांसा अहवालात स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर किंवा बालहक्कांचे उल्लंघन आढळल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.
.............................
पोलिसांना मिळाला
प्राथमिक अहवाल
कऱ्हाड : येथील क्रांतिवीर माधवराव जाधव बालनिरीक्षण गृहातील दुर्दैवी अंत झालेल्या निशांत नितीन शिलेवंत (वय १३, रा. वडगाव-उंब्रज) या बालकाच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा प्राथमिक अहवाल पोलिसांना आज मिळाला. त्यामध्ये शरीरातंर्गत व बाह्य असा कोठेच मोठ्या किंवा गंभीर जखमी नाहीत, असे स्पष्ट झाले असल्‍याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली. मात्र, तरीही उत्तरीय तपासणीचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टता येईल, असेही श्री. दराडे यांनी स्पष्ट केले.
घटनेप्रकरणी २५ ऑगस्टपासूनचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेथे असलेल्या प्रत्येक बालकाचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्या जबाबातूनही खरी स्थिती समोर येण्यास हातभार लागणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. निशांत शिडीवरून पडला होता, त्याला बेंच लागला होता, असे काही बालक सांगत आहेत. त्याची सीसीटीव्हीतून खात्री केली जाणार आहे. निशांत यांच्या नातेवाइकांनाही पोलिसांनी सीसीटीव्ही बघण्यासाठी बोलावले आहे. तपास पारदर्शी व वस्तुस्थितीला धरून होणार आहे, असे पोलिस निरीक्षक श्री. दराडे यांनी स्पष्ट केले.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com