मुलाशी बोलल्याच्या रागातून मुलीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

याप्रकरणी गणेश उर्फ समीर हणुमंत खरात (रा. निमसाखर) याच्यावर अल्पवयीन मुलीचा खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वालचंदनगर -  गावातील मुलाशी बोलल्याचा रागातून केलेल्या बेदम मारहाणीत आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना निमसाखर (ता. इंदापूर) येथे सोमवारी (ता. 2) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मारहाण करणारा फरारी झाला आहे. 

या घटनेत अश्‍विनी हनुमंत पोटफोडे (वय 15, रा. निमसाखर) हिचा मृत्यू झाला. मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गणेश ऊर्फ समीर हनुमंत खरात (रा. निमसाखर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, अश्‍विनी ही सोमवारी (ता.2) गावातील मुलाबरोबर बोलल्याचा राग मनात धरून गणेश याने रात्री साडेआठच्या सुमारास बस स्थानकात जाण्याचा बहाणा केला. अश्‍विनी व तिची आई या दोघींना दुचाकीवरून गावाजवळच्या नीरा नदीकाठच्या वनविभागाच्या हद्दीतील निर्जनस्थळी झाडीत नेले. झाडाखाली गाडी थांबवून लिंबाच्या काठीने अश्‍विनीच्या दोन्ही पायावर व कपाळावर जबर मारहाण केली. या वेळी त्याने तिच्या आईलाही मारण्याचा प्रयत्न केला. घरी आल्यानंतर अश्‍विनीच्या दोन्ही पायांतून रक्तस्राव थांबत नसल्याने तिला वालचंदनगरमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निमसाखर गावात तणावाचे वातावरण आहे.

पोलिस बंदोबस्तात अश्‍विनी हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली आहेत. वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor girl stabbed to death on suspicion of assault in Walchandnagar