

मिरी ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी सुरू
करंजी, ता. ४ ः मिरी ग्रामपंचायतीच्या २०२० ते २०२६ या सहा वर्षांच्या कालावधीत चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय चौकशी समितीने ग्रामपंचायत कार्यालयात दाखल होत तब्बल दोन तास विविध मुद्द्यांवर चर्चा करून चौकशीची कार्यपद्धती निश्चित केली.
समितीत बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. एच. खेडकर आणि पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता जी. बी. बनकर यांचा समावेश आहे. बैठकीस तक्रारदार उज्ज्वला जालिंदर गवळी, ग्रामसेवक रमेश त्रिंबके यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
चौकशीच्या पहिल्या टप्प्यात तक्रारदाराचे म्हणणे नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय मंजुरी, कामांच्या फाइल्स, ऑनलाइन बिले, बँक स्टेटमेंट, अभिलेखे आणि अन्य आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. संबंधित कालावधीतील तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींचे म्हणणेही नोंदविण्यात येणार आहे.
दरम्यान, विस्तार अधिकारी गिऱ्हे यांनी ग्रामसेवक रमेश त्रिंबके यांना २०२० ते २०२६ या कालावधीतील वित्त आयोगाच्या सर्व कामांच्या फाइल्स व कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. सर्व अभिलेखे स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. चौकशी समिती पुन्हा मिरी येथे येऊन कागदपत्रांची पडताळणी व प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याने या चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे मिरीकरांचे लक्ष लागले आहे.
---
“केवळ कागदपत्रांपुरती चौकशी मर्यादित न ठेवता, तक्रारीतील संशयित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष कामांची पडताळणी केली जाणार आहे.”
— संजय गिऱ्हे, चौकशी अधिकारी, पाथर्डी
---
“तक्रारीतील सर्व मुद्दे समितीसमोर मांडले. अधिकाऱ्यांनी चौकशीची कार्यपद्धती समजावून सांगून शंकांचे निरसन केले. निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार चौकशी करण्यास आम्ही सहमती दिली आहे.”
— उज्ज्वला गवळी, तक्रारदार, मिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.