आत्मनिर्भरतेची यशस्वी भरारी

आत्मनिर्भरतेची यशस्वी भरारी
Published on

भारताचे ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या ‘एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा’मुळे (आयजीएमडीपी) भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात अभूतपूर्व स्वयंपूर्णता मिळवली आहे. ‘पृथ्वी’, ‘अग्नी’पासून ते अद्ययावत ‘पिनाक’ प्रणाली आणि ‘मिशन शक्ती’पर्यंतचा हा प्रवास भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या ताकदीचा आणि जागतिक वर्चस्वाचा निर्विवाद पुरावा आहे.
- काशीनाथ दामोदर देवधर, डीआरडीओतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ

क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची पायाभरणी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी १९८२ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हाती घेतलेल्या ‘एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा’चे (आयजीएमडीपी - IGMDP) यशस्वी नेतृत्व केले. या अंतर्गत पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग आणि अग्नी या पाच जागतिक दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात आला. या यशस्वी विकासानंतर डीआरडीओला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारा तांत्रिक पाया आणि प्रचंड आत्मविश्वास मिळाला. याच तंत्रज्ञानाच्या बळावर २७ मार्च २०१९ रोजी भारताने ३०० किमी उंचीवरील कक्षेत असलेल्या आणि ७ ते १० किमी प्रतिसेकंद इतक्या प्रचंड वेगाने फिरणाऱ्या ‘मायक्रो सॅट-आर’ (Microsat-R) उपग्रहाला अचूकपणे खाली पाडले. ‘मिशन शक्ती’ नावाच्या या मोहिमेमुळे भारत हे तंत्रज्ञान विकसित करणारा जगातील चौथा देश बनला आणि जगाला दाखवून दिले की, ‘हम भी कुछ कम नहीं है.’

डॉ. कलाम यांच्या नेतृत्वाखालील पाच प्रमुख क्षेपणास्त्रे
१९८२ ते १९९७ या कालावधीत डॉ. कलाम यांनी एकाच वेळी खालील पाच वेगवेगळ्या वर्गांतील क्षेपणास्त्रांचे प्रकल्प यशस्वीपणे राबवले
१. पृथ्वी : कमी पल्ल्याचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र (SSM).
२. अग्नी : लांब पल्ल्याचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र (SSM).
३. आकाश : मध्यम पल्ल्याचे, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (SAM).
४. त्रिशूल : कमी पल्ल्याचे, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (SAM).
५. नाग : रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र (ATGM).
प्रत्येक क्षेपणास्त्राची भूमिका, आकार, प्रचालन (Propulsion), मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणाली पूर्णपणे भिन्न होती.

भारताची विविध स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि त्यांची क्षमता
१) पृथ्वी क्षेपणास्त्र मालिका
या मालिकेत P1, P2 आणि P3 अशा तीन आवृत्त्या असून ती कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (SRBM) आहेत. युद्धनौकेवरून किंवा जमिनीवरून क्षेपणास्त्र डागण्यासाठी ‘धनुष’ या स्थिर व्यासपीठाचा वापर केला जातो. हे क्षेपणास्त्र लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांसाठी उपयुक्त आहे.

२) अग्नी क्षेपणास्त्र मालिका
सुरुवातीला हा केवळ एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रकल्प होता, मात्र नंतर अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ यशस्वीपणे विकसित करण्यात आले. या मालिकेने आंतरखंडीय (ICBM) क्षेपणास्त्रांचा मार्ग प्रशस्त केला. अग्नी-५ ने किमान ५,५०० किमी पल्ला गाठून भारताला आंतरखंडीय क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या देशांच्या रांगेत नेऊन बसवले. अग्नी-५ हे ‘एमआयआरव्ही’ (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, ते १५ किलोटन ते २५० किलोटन वजनापर्यंतची पारंपारिक आणि अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. अनधिकृत सूत्रांनुसार, भारत ८,००० ते १२,००० किमी पल्ल्याचे अग्नी-६ आणि सूर्या क्षेपणास्त्र विकसित करत असल्याचीही चर्चा आहे.

३) शौर्य आणि ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे
- ‘शौर्य’ हे ६०० किमी पल्ला असलेले आणि पारंपारिक किंवा अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे.
- ‘ब्रह्मोस’ हे रशियाच्या सहकार्याने विकसित केलेले जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे. याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट (३ मॅक) आहे. भारतीय लष्कर आणि नौदलात ते आधीच सामील झाले असून, आता त्याच्या ७ मॅक वेगाच्या अत्यंत घातक आवृत्तीवर काम सुरू आहे.

४) निर्भय, प्रहार आणि अस्त्र
- ‘निर्भय’ हे लांब पल्ल्याचे आणि ०.६ मॅक वेगाने उड्डाण करणारे ‘सबसोनिक’ क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
- ‘प्रहार’ हे घन इंधनावर चालणारे, कमी अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र असून, ते कोणत्याही दिशेला मारा करू शकते.
- ‘अस्त्र’ हे हवाई दलासाठी बनवलेले ‘हवेतून हवेत’ मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे ‘दृश्य श्रेणीच्या पलीकडे’ (Beyond Visual Range - BVRAAM) जाऊन शत्रूच्या विमानाचा अचूक वेध घेते.

५) नाग आणि हेलिना
नाग हे तिसऱ्या पिढीचे ‘दागा आणि विसरा’ (Fire and Forget) तंत्रज्ञानावर आधारित रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. हे शत्रूचे अत्याधुनिक रणगाडे ‘टॉप अटॅक’ पद्धतीने नष्ट करते. याच्या प्रक्षेपणासाठी ‘नामिका’ हे वाहन विकसित केले आहे. ‘हेलिना’ ही याच नाग क्षेपणास्त्राची हेलिकॉप्टरवरून डागता येणारी आवृत्ती आहे.

६) हायपरसोनिक टेक्नॉलॉजी (HSTDV), स्मार्ट आणि रुद्रम
डीआरडीओ सध्या हायपरसोनिक तंत्रज्ञानावर (HSTDV) काम करत आहे.
- स्मार्ट (SMART) : भारतीय नौदलासाठी विकसित केलेले हे लांब पल्ल्याचे पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र आहे. हे हवेत सुपरसॉनिक वेगाने प्रवास करून शत्रूच्या पाणबुडीजवळ टॉर्पेडो सोडते.
- रुद्रम (RUDRAM) : हे हवेतून जमिनीवर मारा करणारे नवीन पिढीचे ‘अँटी-रेडिएशन’ क्षेपणास्त्र आहे. शत्रूचे रडार आणि संप्रेषण प्रणाली शोधून ती नष्ट करण्यासाठी हे विकसित करण्यात आले आहे.

७) आकाश आणि त्रिशूल (हवाई संरक्षण प्रणाली)
‘आकाश’ हे फिरते मध्यम पल्ल्याचे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र आहे. हे १८ किमी उंचीवर आणि ३० किमी अंतरापर्यंत विमान किंवा क्षेपणास्त्राला लक्ष्य करू शकते. स्वदेशी ‘राजेंद्र’ रडार प्रणालीसोबत ‘आकाश’ भारताला भक्कम ‘हवाई सुरक्षा कवच’ प्रदान करते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी याची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे. त्रिशूलचा विकास आता थांबवण्यात आला असून त्याऐवजी नवीन ‘क्यूआरएसएम’ (QRSM) प्रणाली विकसित होत आहे.

८) ‘के’ (K) क्षेपणास्त्र मालिका
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ पाणबुडीवरून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रांची गुप्त ‘के-मालिका’ (उदा. K-15) विकसित केली गेली आहे. ही क्षेपणास्त्रे अग्नी क्षेपणास्त्रांपेक्षा वेगवान, हलकी आणि रडारला चकवा देणारी (Stealth) आहेत. यामुळे भारताची ‘दुसरी प्रहार क्षमता’ (Second Strike Capability) लक्षणीयरीत्या वाढली आहे.

मिशन शक्ती
हवाई धोक्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी डीआरडीओ बहुस्तरीय संरक्षण प्रणालीवर (BMD) काम करत आहे. यात दोन इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे आहेत :
- पृथ्वी एअर डिफेन्स (PAD / प्रद्युम्न) : वातावरणाच्या बाहेर (८० किमी उंचीवर) ५ मॅक वेगाने येणारी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यासाठी.
- ॲडव्हान्स्ड एअर डिफेन्स (AAD / अश्विन) : वातावरणाच्या आत (२०-४० किमी उंचीवर) काम करणारी प्रणाली.

उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र (A-SAT) मिशन शक्ती :
अंतराळातील भारतीय संपत्तीचे (उदा. चांद्रयान, मंगळयान) रक्षण करण्यासाठी २७ मार्च २०१९ ला ‘मिशन शक्ती’ अंतर्गत ‘अँटी-सॅटेलाइट’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने ३०० किमी कक्षेत ८-१० किमी/सेकंद वेगाने फिरणाऱ्या उपग्रहाला अवघ्या ३ मिनिटांत अचूकपणे नष्ट करून भारताची अंतराळ संरक्षण क्षमता सिद्ध केली.

भारत अधिक बलवान : निर्देशित पिनाक
गेल्या चार दशकांमध्ये भारताने संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात, विशेषतः क्षेपणास्त्रांमध्ये मोठी झेप घेतली आहे. १९९८ च्या अणुचाचण्यांपासून ते अण्वस्त्रे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, सुरखा कवच (BMD), आणि ब्रह्मोससारख्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपर्यंतचा भारताचा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. याच मालिकेतील एक मोठा टप्पा म्हणजे मागील वर्ष २०२५ च्या शेवटच्या काही दिवसांत भारताने घेतलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या. भारताने आपली सीमा न ओलांडता चक्क १२० किमी दूरवर असलेल्या शत्रूच्या लक्ष्यावर अचूक मारा करून ते नष्ट करण्याची क्षमता मिळवली आहे. बहुनलिकीय अग्निबाण प्रणाली ‘पिनाक’ची सुधारित आवृत्ती म्हणजेच ‘निर्देशित पिनाक’ (Long Range Guided Rocket - LRGR-120) च्या यशस्वी चाचण्या ओडिशाच्या बालेश्वराजवळील चांदिपूर येथे करण्यात आल्या. याचा परिणाम अतिशय उत्साहवर्धक होता. सर्व चाचण्यांचे निष्कर्ष अपेक्षेनुसार १०० टक्के अचूक (Textbook Precision) मिळाले. प्रक्षेपकापासून सुरू झालेला आणि शत्रूचा वेध घेईपर्यंतचा हवाई मार्ग अचूकपणे नोंदवण्यासाठी पल्ला मापन आणि मार्गक्रमण नोंदवणारी यंत्रणा (Range Instrumentation) पूर्णवेळ कार्यरत होती. ही ‘निर्देशित पिनाक’ प्रणाली पुणे येथील डीआरडीओच्या महत्त्वाच्या ‘एआरडीई’ (ARDE) संस्थेमध्ये विकसित करण्यात आली आहे. ‘पिनाक’ प्रणालीमध्ये माझेही छोटेसे योगदान असल्याने, या यशाने माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. जमिनीवरून डागता येणाऱ्या आणि ४५ किमी अंतरावरील लक्ष्य भेदणाऱ्या प्रणालीपासून सुरू झालेला प्रवास ‘पिनाक-मार्क १’ (३९ किमी) मार्गे आता थेट १२० किमी पल्ल्याच्या ‘निर्देशित पिनाक’पर्यंत पोहोचला आहे. यामुळे भारतीय सशस्त्र सेनेचा तोफखाना विभाग प्रचंड मजबूत झाला आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी रचलेल्या भक्कम पायावर डीआरडीओने अथक प्रयत्नांतून भारताला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनवले आहे, ज्यामुळे आपला देश ‘भारत माता विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com