हरवलेली श्रुती २ तासांत पालकांच्या कुशीत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली.

सोशल मीडियावरून फोटो व्हायरल केल्याने तातडीने तपास
चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथून हरवलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि अवघ्या दोन तासांत ती मुलगी आई-वडिलांच्या कुशीत विसावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रुती हंसराज पावरा (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे हरवलेल्या मुलीचे नाव आहे. पावरा कुटुंब हे नाणेकरवाडीत चाकण-तळेगाव रस्त्याजवळ राहते. श्रुती खेळत खेळत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर आली; पण घरी परत जाण्याची वाट सापडत नसल्यामुळे ती रडू लागली. तेथून जाणाऱ्या भावना मानपाडे व सामल अडसुळे यांनी ही मुलगी कोणाची आहे, याबाबत परिसरात चौकशी केली; पण तिचे आई-वडील मिळू शकले नाहीत. त्यानंतर श्रुतीला घेऊन त्या दोघींनी चाकण पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना तिच्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रुतीला तिच्या घराचा पत्ता व आई वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी शेवटी तिचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला. 

सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या फोटोबाबत श्रुतीचे वडील हंसराज पावरा, आई निकिता पावरा यांना माहिती समजली. त्या दोघांनी चाकण पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी मुलगी श्रुती क्षणार्धात त्यांच्याकडे गेली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी श्रुतीला त्यांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियामुळे श्रुती अवघ्या दोन तासांत आई-वडिलांच्या कुशीत विसावली, असे चाकण पोलिस ठाण्याचे फौजदार विशाल दांडगे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: missing girl was found by the parents within two hours