esakal | सिंगापूरहून मागवलेले कॉन्संट्रेटर आणि व्हेंटिलेटर पुण्यात दाखल

बोलून बातमी शोधा

Oxygen

सिंगापूरहून मागवलेले कॉन्संट्रेटर आणि व्हेंटिलेटर पुण्यात दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या गरजू रुग्णांसाठी ‘मिशन वायू’ अतंर्गत सिंगापूरहून मागविलेले ४ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि २५० बायपॅक व्हेंटिलेटर शहरात दाखल होऊ लागले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सतर्फे (पीपीसीआर) पहिल्या टप्प्यात आलेले कॉन्संट्रेटर आणि व्हॅंटिलेटरचे वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे. तसेच ३० कोटी रुपयांच्या निधी संकलनासही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

ऑक्सिजन आणि व्हेंटिलटरचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘पीपीसीआर’ने सिंगापूरच्या टेमासेक फाऊंडेशी संपर्क साधला. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांनी सवलतीच्या दरात ऑक्सिजन आणि बायपॅक व्हॅटिलेटर दिले आहेत तर, ॲमेझॉन इंडियाने त्याची मोफत वाहतूक केली आहे. त्यामुळे पीपीसीआरच्या खर्चात बचत झाली आहे. कॉन्संट्रेटर आणि व्हॅंटिलेटर शहरात आणण्यासाठी पीपीसीआरने ३० कोटी रुपयांचे निधी संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. बजाज ग्रूप, उद्योगपती डॉ. अभय फिरोदीया, मेहेर पद्मजी, रवी पंडित, प्रमोद चौधरी, टॅलेटिका आदींनी त्यात भरीव योगदान दिले आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर असलेल्या जिल्ह्यांचा पीपीसीआरने नुकताच आढावा घेतला. त्यात नगर, चंद्रपूर, भंडारा, ठाणे, नाशिक, नागपूर, पालघर आणि लातूरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले. त्यामुळे सिंगापूरहून आलेले ऑक्सिजन आणि व्हॅंटिलेटर तेथे पोचविण्यात येत आहेत. त्यासाठी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. तसेच कोरोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या या जिल्ह्यांसाठी देशातील, परदेशातील नागरिकांना मदत करायची असेल तर, त्यासाठी पीपीसीआरच्या संकेतस्थळावरून नागरिकांना मदत करता येईल. त्या ऩिधीतून वैद्यकीय उपकरणांची खरेदी करून संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती एमसीसीआयचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.

फिरत्या स्वरूपात मदत

‘मिशन वायू’तंर्गत शहर, पिंपरी चिंचवडमधील काही खासगी रुग्णालयांनाही या उपकरणांची फिरत्या स्वरूपात मदत केली जात आहे. या रुग्णालयांत रुग्णांची गर्दी जास्त असल्यामुळे त्यांना ही उपकरणे देण्यात आली आहे. गर्दी कमी झाल्यावर ही उपकरणे अन्य रुग्णालयांत दिली जातील. तसेच अनेक रुग्णालयांनी या उपकरणांचा वापर सुरू केला आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतही ही उपकरणे देण्यात आली आहेत, अशी माहिती गिरबने यांनी दिली.