कोथरुडमधून मनसे व राष्ट्रवादीची ऑफर : मेधा कुलकर्णी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्याशी एका वाहिनीने संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, मला राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्या आहेत, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून, पक्षासाठीच काम करणार आहाेत.

पुणे : भाजपने आपल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पुण्यातील सेफ मतदार संघ म्हणजे काेथरूड निवडला. या निर्णयामुळे तेथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. ब्राह्मण महासंघाने देखील त्यांच्या बाजूने काैल देत पाटील यांना विराेध केला.

दरम्यान, मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्याशी एका वाहिनीने संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “मला राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्या आहेत, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून, पक्षासाठीच काम करणार आहाेत.”

चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच, कोथरुडमध्ये जातीय राजकारण चांगलंच रंगलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेनेही मेधा कुलकर्णी यांना संपर्क साधत ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आपण भाजपशी एकनिष्ठ असून, नम्रपणे दोघांच्याही ऑफर नाकारल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

चंद्रकात पाटील यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. त्यामुळे मतदारसंघाचा जास्त विकास होईल. आपण चंद्रकात पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून, ब्राह्मण महासंघानेही वेगळी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्यावा - दवे 

या मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla medha kulkarni claims she had a offer from mns and ncp