अजित पवारांनी 'त्या' दोघांच्या वादात आमदारांना बोलावले अन्...

उमेश शेळके
Friday, 3 July 2020

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' अशी मराठीत म्हण आहे. त्या म्हणीचा प्रत्यय दोन नगरसेवकांना शुक्रवारी आला.

पुणे : " दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' अशी मराठीत म्हण आहे. त्या म्हणीचा प्रत्यय दोन नगरसेवकांना शुक्रवारी आला. तळजाईच्या प्रकरणावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्या दोन नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. पालकमंत्र्यांच्या उपस्थिीत तो मिटले, असे वाटत असताना, मंत्र्यांनी यामध्ये आमदारांना लक्ष घालण्याचे आदेश दिल्याने अपापसातील वादामुळे "हाती..धुपाटणे आले' अशी अवस्था त्या दोघांची झाली. त्यावरून महापालिका वर्तुळात आज दिवसभर ही चर्चा रंगली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळजाई येथील जागेवर वन उद्यान विकसित करण्यासंदर्भात गुरुवारी आयुक्तांनी त्यांच्या दालनात बैठक बोलविली होती. या बैठकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांची जोरदार बाचाबाची झाली. अखेर आयुक्तांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. तेव्हा हा वाद मिटला. खातेप्रमुखांसमोरच हा वाद झाल्याने महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता.

दरम्यान, जागेसंदर्भात आज पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीला या दोन्ही नगरसेवकांबरोबरच आयुक्त देखील उपस्थित होते. या बैठकीत एका नगरसेवकाने या जागेवर पर्यटन स्थळ करण्याचा मांडला, तर दुसऱ्याने वन उद्यानाचा. महापालिकेचे उत्पन्न कसे मिळेल, या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना आयुक्तांनी केली. तेव्हा दादांनी स्थानिक आमदारांना बोलाविण्याचे फर्मान सोडले. आमदारही बैठकीला हजर झाल्या. बैठकीत चर्चा रंगल्यानंतर "आधी न्यायालयीन वाद मिटवा, त्यानंतर काय तो निर्णय घेऊ' असे ठरले. तेव्हा दोघांनाही बरोबर घेऊन आमदारांनी जो काय तो निर्णय घ्यावा, सरकारच्या स्तरावर काय मदत लागेल, ती मी देतो, असे सांगून दादांनी बैठक उरकती घेतली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आमदार आणि या दोन्ही नगरसेवकांचे संबंध सर्वश्रुत आहेत. दादांनीच आमदारावर जबाबदारी टाकल्यामुळे या दोन्ही नगरसेवकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यातून आता पुढे आणखी काय वाद रंगणार यावरून महापालिकेच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यास सुरवात झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The MLA will mediate in the dispute between the two corporators says ajit pawar