ईडीच्या 9 तासांच्या चौकशीनंतर राज प्रथमच बोलणार अन् तारिखही नऊच

सागर आव्हाड
Wednesday, 9 October 2019

9 मार्च 2006 लाच मनसेची स्थापना केली. ईडीने राज ठाकरे यांची चौकशी 9 तास केली होती तर निवडणुकी मतदान 21 तारखेला होणार आहे. तर 24 ला मतमोजणी होणार आहे. दोन्हीची बेरीज 9 होते.

पुणे : कोणाचा अंक गणित भविष्यवर विश्वास नसला, तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अंक गणितावर नक्कीच विश्वास आहे. ही श्रद्धा की अंधश्रद्धा आहे माहीत नाही पण 9 आकडा आणि राज ठाकरे यांचा जवळचा संबंध आहे. आज (ता. 9) होणारही तसेच आहे. कारण, ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे प्रथमच जाहीरपणे आपली भूमिका मांडणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी तारिखही नऊच निवडली आहे.

राज ठाकरे आज पुण्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करणार आहेत. आज पुण्यात पक्षाची पहिली प्रचार सभा होणार आहे. पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर नऊ निवडला आहे. राज नऊ हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ या नंबरभोवती फिरताना दिसतात. राज ठाकरे किंवा मनसेचा नऊ नंबरवर दृढ विश्वास असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

शिवसेना सोडण्यापासून ते मनसेच्या घोषणेपर्यंत, गाडीच्या नंबरपासून ते विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यापर्यंत सर्वत्र नऊ हाच नंबर दिसतो. उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली ती 27 उमेदवारांची. त्यामुळे 2+7 =9 इथेही नऊचे गणित जुळून येते. दुसरी उमेदवार यादी 45 उमेदवारांची आहे, नऊ तारखेला प्रचाराला सुरवात, असा सर्व या अंकाशी मेळ घातल्याचे दिसून येते. त्यांच्या गाडीचा नंबर ही 9 आहे तर अमित ठाकरे यांच्या लग्न ही 9 तारखेला केलं होतं तर 9 मार्च 2006 लाच मनसेची स्थापना केली. ईडीने राज ठाकरे यांची चौकशी 9 तास केली होती तर निवडणुकी मतदान 21 तारखेला होणार आहे. तर 24 ला मतमोजणी होणार आहे. दोन्हीची बेरीज 9 होते.

राज ठाकरे यांनी 27 डिसेंबरला शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 18 जानेवारीला सेना सोडली. टेलिकॉम कंपन्यांना मराठीत सेवा देण्याचं आंदोलन 27 फेब्रुवारीला केलं होत. या सर्व घडामोडी राज ठाकरे यांना 9 अंक लकी पाहून झाल्या असतील. मात्र, आजची सभा 9 तारखेला आहे. निकाल आणि मतदान त्यांच्या योगायोग्यने जुळून आला असला तरी 9 आकडा 9 आमदार देतील का आणि 9 आकडा लकी ठरतो का पाहावं लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray holds rally in Pune