
आंतरराज्यीय टोळीकडून एकूण पंधरा लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे ८४ मोबाईल हस्तगत
धायरी : सिंहगड रोड पोलीसांनी गणेश उत्सवात धडाकेबाज कारवाई केली. गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीकडून एकूण ८४ मोबाईल फोन जप्त केले. सध्या राज्यामध्ये गणेशोत्सव सण मोठया प्रमाणात साजरा होत असून, या सणा निमित्त खरेदी व दर्शनाकरीता लोक मोठया प्रमाणात गर्दी करीत असतात. याच गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी व पाकिट चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता असते.
अशा गुन्हयांना आळा घालण्यासाठी काही गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील अधिकारी व अंमलदार नमूद गुन्हयांच्या तपासाच्या अनुषंगाने पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत होते. पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर शिवाजी क्षिरसागर यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, मोबाईल चोरी करणारे तीन जण फनटाईम थिएटरच्या मागील रोडवर थांबलेले असून दोन काळ्या रंगाच्या बॅग आहेत. त्यामध्ये चोरी केलेले मोबाईल आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या ठिकाणी तीन संशयित उभे असल्याचे व हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना सापळा रचून जागीच दि.१ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सोबत असणारा एक आरोपी पळून जावू लागल्याने त्याला देखील थोड्या अंतरावर पाठलाग करुन पकडण्यात आले.
त्यांची नावे पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे १) शरथ मंजुनाथ (वय २१ वर्षे, रा. हनुमंतनगर हासमाने मारीअम्मा मंदीराजवळ, भद्रावती, शिमोगा, कर्नाटक राज्य सध्या पुणे फिरस्ता) २) केशवा लिंगराजु, (वय २४ वर्षे, रा. पहीला क्रॉस संते मंदीना, भोवी कॉलनी, भद्रावती, शिमोगा, कर्नाटक, सध्या पुणे फिरस्ता) ३) नवीन हनुमानथाप्पा ( वय १९ वर्षे, रा. पहीला क्रॉस उजव्या बाजुस उडुकलांबा मंदीराजवळ भोवी कॉलनी हौसमाने, भद्रावती, शिमोगा, कर्नाटक सध्या पुणे ) अशी असल्याचे त्यांनी सांगितले. बॅगांची पाहणी केली असता शरथ मंजुनाथ याच्या ताब्यातील बॅगमध्ये अँपल,विवो ओपो, सॅमसंग रेडमी रिअलमी कंपनीचे एकुण ४२ मोबाईल हँडसेट मिळून आले.
केशवा लिंगराजु यच्या बॅग मध्ये अॅपल, विवो, औपो, सॅमसंग, रेडमी, रिअलमी कंपनीचे एकुण ४१ मोबाईल हैंडसेट मिळून आले. तर नवीन नुमानथाप्पा याच्या पॅन्टच्या खिशामध्ये १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असे एकूण १५,२५,००० किंमतीचे एकूण ८४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
मोबाईल फोन संदर्भात त्यांच्याकडे पावतीची व मूळ मालकाची विचारणा केली तेव्हा त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने मोबाईल नक्कीच चोरुन आणले आहेत याची खात्री झाली. नवीन नुमानथाप्पा याच्याकडे मिळून आलेल्या मोबाईल बाबत अधिक तपास केल्यावर त्याने व साथीदार यांनी मार्केटयार्ड भाजी मंडई, स्वारगेट बस स्टैण्ड, बालाजीनगर, कात्रज भाजी मार्केट, अभिरुची परिसर, वडगाव भाजी मार्केट व पुणे शहराच्या इतर गर्दीच्या ठिकाणावरुन मागील १० दिवसांपासून चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले.
मोबाईल कोठून, केव्हा चोरले आहेत व मोबाईलचे मूळ मालक कोण याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन निकम करत आहेत. तसेच ज्या नागरिकांचे मोबाईल फोन चोरीस गेलेले आहेत त्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन संपर्क क्र. ०२०-२४२६८२७०, अविनाश कोडे मो.नं. ९७६४६४७९६४, देवा चव्हाण मो.नं.८२७५७२०४८७ यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कामगिरी अमिताभ गुप्ता( पोलीस आयुक्त ) संदीप कर्णिक (पोलीस सहआयुक्त) राजेंद्र डहाळे (अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग) पौर्णिमा गायकवाड )पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३) सुनिल पवार( सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संख्ये, पोलीस निरीक्षक(गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, आबा उत्तेकर,संजय शिंदे,शंकर कुंभार, अमित बोडरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोंडे, अमोल पाटील, विकास पांडुळे, विकास बांदल, दिपक शेंडे, सचिन गाढवे, नलिन येरुणकर यांनी केली.