पिंपोडे बुद्रुक फिरते पशुचिकित्सा पथक
पशुस्वास्थ्य योजनेत सहा तालुक्यांवर अन्याय
पशुपालकांना खासगीचा भुर्दंड; फिरते पशुचिकित्सा पथक देण्याची मागणी
पिंपोडे बुद्रुक,, ता. ५ : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यांनाच फिरत्या पशुचिकित्सा पथकाची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेपासून फलटण, कोरेगाव, खंडाळा, पाटण, महाबळेश्वर व जावळी हे सहा तालुके अद्याप वंचित आहेत. परिणामी दुर्गम भागातील पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी पशुवैद्यकांवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरे दगावण्याच्या घटनाही वाढत असल्याने या तालुक्यांनाही तातडीने फिरते पशुचिकित्सा पथक उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत दुर्गम भागातील पशुपालकांना गोठ्यापर्यंत पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथके स्थापन करण्यात आली आहेत. राज्यातील ३४९ तालुक्यांपैकी ८० तालुक्यात हा पथदर्शी प्रकल्प राबवला जातोय. त्यासाठी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात मध्यवर्ती कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून १९६२ नंबरची टोल फ्री हेल्पलाइन कार्यान्वित आहे. नाममात्र दरात ही सुविधा पुरवली जात आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी सातारा, कऱ्हाड, वाई, माण व खटाव या तालुक्यांत ही सेवा उपलब्ध आहे. मात्र फलटण, कोरेगाव, खंडाळा, पाटण, महाबळेश्वर, जावळी हे दुर्गम व पशुपालनात अग्रेसर असणारे तालुकेच या सेवेपासून अद्याप वंचित ठेवण्यात आले आहेत. रोगांचे अचूक निदान करण्यासाठी सूक्ष्मदर्शक, जनावरांवर उपचारासाठी आवश्यक औषधे आणि शस्त्रक्रिया साहित्य, कृत्रिम रेतनासाठी उपकरणे, शवविच्छेदन आणि नमुने गोळा करण्यासाठीचे साहित्य, पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी दूरचित्रवाणी आणि ध्वनिक्षेपक यांनी हे फिरते दवाखाने सज्ज आहेत. पशुपालकांना जनावरांच्या आजारांचे वेळेत निदान आणि उपचार करणे सोपे व्हावे आणि पशुधनाचा मृत्यूदर कमी होण्यास मदत मिळावी, हा यामागील उद्देश आहे. याचा विशेषतः दुधाळ जनावरांना चांगला फायदा होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था दुग्धव्यवसायावर आधारित आहे. दूध उत्पादकांना दर दहा दिवसांनी डेअरीमार्फत खात्यावर बिल जमा केले जाते. त्यामुळे खेडेगावच्या बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढत असते. मात्र दुधाळ गाई आजारी पडल्यावर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे.खासगी डॉक्टर भरमसाठ फी आकारतात. दुर्गम भागामुळे वेळेवर उपचार न झाल्यास जनावर दगावण्याचा धोका वाढतो. दुभत्या गाईचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यास पशुपालकांना लाखभर रुपयांचा तोटा होतो. अशावेळी त्याचे अर्थकारण कोलमडून जाते. यासाठी या फिरत्या पशुचिकित्सा पथकाची आवश्यकता आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कोट
कामाच्या ताणामुळे शासकीय पशुवैद्यक वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गाईवर उपचारासाठी खासगी डॉक्टरवर अवलंबून राहावे लागते. जनावरांच्या आरोग्यावर सातत्याने खर्च करावा लागत असल्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. नोकरी नसल्यामुळे अनेक तरुण दूध व्यवसाय करतात. शासनाने फिरते पशुचिकित्सा पथक उपलब्ध करून दिल्यास आम्हाला दिलासा मिळू शकेल.
- राहुल नलवडे, युवा दूध उत्पादक, राऊतवाडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

