#MobileAddict वेळ द्या मुलांना; मोबाईलला नव्हे!

गुरुवार, 3 जानेवारी 2019

पुणे - धनकवडीतील तेरा वर्षांच्या मुलाला मोबाईलवर खेळू दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यातूनच असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामध्ये शिक्षकांबरोबरच पालकांची मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही घटकांनी मुले सोबत असताना काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या व काही गोष्टी प्राधान्याने केल्या, सुसंवादाचा पूल उभारला, तर लहान मुलांचे भावविश्‍व फुलल्याशिवाय राहणार नाही.    

पुणे - धनकवडीतील तेरा वर्षांच्या मुलाला मोबाईलवर खेळू दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यातूनच असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामध्ये शिक्षकांबरोबरच पालकांची मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही घटकांनी मुले सोबत असताना काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या व काही गोष्टी प्राधान्याने केल्या, सुसंवादाचा पूल उभारला, तर लहान मुलांचे भावविश्‍व फुलल्याशिवाय राहणार नाही.    

मूल रडतंय ना. मोबाईल त्याच्या हाती दिला की होईल शांत. तसं घडतं आणि घडत राहातं. या दरम्यान त्याच्या आयुष्यात भासमान (व्हर्च्युअल) जग डोकावतं. तेच त्याला खेळवतं, बागडवतंही. आई-बाबा दूर जातात, मोबाईल मात्र जवळ राहतो. त्यातलं हलतं जग त्याच्या मनात बसतं. हे जग थोडं बाजूला केलं की संताप आणि चिडचिड. मग मूल आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय कधी घेतं, हे समजतंही नाही. 

नात्यांतील दुरावा का?
मोबाईल ही अशी वस्तू आहे की, तिच्यामुळे नात्यातही दुरावा येऊ लागला आहे. आई-बाबा दोघंही नोकरीला. घरी आलं की दोघांच्याही हाती मोबाईल. मग मुलानं काय करावं? त्याला हवे असलेली मायेची ऊब अर्थातच आजच्या भाषेत मुलांना आई-बाबांकडून देय असलेला ‘क्वॉलिटी टाइम’ मोबाईलने हिरावून घेतलाय. कोवळ्या वयात मुलांकडून विचारले जाणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरेही आता मोबाईल देऊ लागलाय. आई-बाबांच्या कुशीत बसून मुलांना आता गोष्टी कुठे ऐकायला मिळतात? दररोज मुलांबरोबर खेळणं, फिरायला जाणंही बंद होत चाललंय, संवाद संपलाय. मुलांच्या मनाला आनंद देणारी साधने आता उरलीत मोबाईल आणि टीव्हीच्या रूपात. मोबाईल नसला की टीव्ही, नाहीतर मोबाईल. मग नात्यांमधला जिव्हाळा तरी कसा टिकणार? हेच तर बदललं पाहिजे.

शिक्षकही दूर जातोय
आई-बाबांपेक्षाही जवळची वाटणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक; पण हे नातंही हरवत चालले आहे. सध्या मुलांना शिक्षकही जवळचा वाटत नाही. शहरीकरण आणि शाळांमधील गर्दी यामुळे मुलांशी आपुलकीचं नातं तयार करण्यासाठी शिक्षकही कमी पडतोय. शाळा म्हणजे फक्त अभ्यास आणि घरी जाताना दिला जाणारा गृहपाठ, हेच समीकरण रूढ झालंय; पण विद्यार्थ्यांची भावनिक गरज शिक्षक ओळखू शकतो. मात्र, विद्यार्थी आणि शिक्षकाची तेवढी जवळीक राहिली आहे का? असं का घडू लागलं आहे, पालक-शिक्षकांचा संवादही का कमी झालाय, हा विचारही शिक्षण संस्था आणि पालक यांना एकत्र येऊनच करावा लागेल.

मूल अधिक वेळ शाळेत असतं. त्याला मोबाईलची उपयुक्तता, त्याच्या अतिवापराचे दुष्परिणाम याबद्दल शिक्षकांकडून प्रबोधन करावं लागेल. लहान वयात त्याला समजणाऱ्या भाषेत समजावलं की मोबाईलचा वापर किती करावा, याचे भान त्याला नक्‍की येईल. पालकांनीदेखील मुलांकडून मोबाईल हिसकावून घेण्यापेक्षा त्याला त्यात चांगले काय, वाईट काय शांतपणे सांगावे. जी गोष्ट त्याला आवडते, ती हिसकावली की त्याचा राग अनावर होणारच. त्यामुळे पालकाने संयमाने स्थिती हाताळली पाहिजे.
- हरिश्‍चंद्र गायकवाड,अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ

दोन शब्द आई-बाबांसाठी...
मोबाईल वा डिजिटल ॲडिक्‍शनपासून मूल बाजूला ठेवायचे असेल, तर त्याला मोबाईल कधी आणि किती वेळ वापरायचा, हा वेळ निश्‍चित करून द्या.
मुलांसमोर असताना पालकांनीही मोबाईलला कॉलव्यतिरिक्त जास्त महत्त्व देऊ नये. मोबाईलपेक्षा कुटुंब, जिव्हाळा महत्त्वाचा असा संदेश कृतीतून द्या.
कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवत असाल किंवा बाहेर फिरायला गेल्यास, हा काळ स्मार्टफोन फ्री आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवा.
घरात मोबाईल वापराच्या जागा निश्‍चित करा. जेवणाची जागा, बेडरूम या ठिकाणी मोबाईल फ्री करून टाका. पालकांनीदेखील तेथे मोबाईल वापरू नये.
तुमचा मुलगा वा मुलगी एकांतात असेल, तर त्याला वेळ द्या, त्याच्याशी गप्पा मारा, खेळादेखील. व्हर्च्युअल जगात रमण्यापेक्षा वास्तव जगात आनंद घेण्याचे त्याला शिकवा.
मोबाईलपेक्षाही आयुष्याची मजा घेता येते, तेही जग रंजक आहे, याची माहिती त्याला द्या. सिनेमा, सीरियलमधील कथा, स्टंट या खोट्या असतात, हेही त्याला पटवून द्या.

Web Title: #MobileAddict Give time to children Not mobile