

वडगाव निंबाळकर, ता. १६ : ‘‘ग्रामीण भागातील नागरिकांना शहरासमान आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार आहे. ‘मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र’ संकल्पनेतून आधुनिक ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसूतिगृह, डिजिटल आरोग्य प्रणाली आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आहे,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एकाचवेळी लोकार्पण डिजिटल पद्धतीने गुरुवारी (ता. १४) केले. यानिमित्त होळ (ता. बारामती) येथे आयोजित मुख्य कार्यक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडले. तसेच, दूरदृश्य प्रणालीद्वारे उर्वरित ४४ केंद्रांचे उद्घाटन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापती दीपाली हुलावळे, महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, सदस्य करण खलाटे, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, सदस्य जितेंद्र पवार, आशाताई वायाळ, भारत फोर्जचे उपाध्यक्ष सदाशिव लोखंडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अभिषेक जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आदर्श संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण सुरू असून, अनेक केंद्रांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहे.’’
‘कर्करोगमुक्त बारामती’चा प्रारंभ
बारामती तालुक्यात ‘माता आणि मुलींसाठी गर्भाशय मुखाचा कर्करोगमुक्त बारामती’ या उपक्रमाचाही प्रारंभ या वेळी करण्यात आला. या माध्यमातून ३० ते ६५ वयोगटातील महिलांची मोफत एचपीव्ही डीएनए तपासणी, तसेच ९ ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण केले जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक आई आणि मुलीला कॅन्सर विरोधी संरक्षण कवच देण्याचे ध्येय ठेवले आहे. बारामतीला ‘गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त तालुका’ करण्याचा निर्धार आहे.
बचतीचा संदेश
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या कार्यक्रमासाठी येताना गाड्यांचा ताफा कमी ठेवत केवळ तीन वाहनांसह कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.