राज्यात मॉडेल ठरेल असा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प पेठला उभारावा : आढळराव पाटील

डी. के. वळसे पाटील
Thursday, 22 October 2020

सातगाव पठार (ता. आंबेगाव) गावांसाठी २३ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या पेठ व सहा गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी राज्यातील मॉडेल ठरेल, असा सौर ऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी पेठला पाच एकर गायरान जागा मिळावी. : आढळराव पाटील

मंचर : सातगाव पठार (ता. आंबेगाव) गावांसाठी २३ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या पेठ व सहा गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी राज्यातील मॉडेल ठरेल, असा सौर ऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी पेठला पाच एकर गायरान जागा मिळावी. या योजनेसाठी नारोडी व घोडेगावच्या सरहद्दीवरील घोडनदी पात्रालगतच्या जागेत पंप हाऊस व विंधन विहिरीकरिता जागा उपलब्ध करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे  केली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे येथे डॉ. देशमुख यांच्या दालनात गुरुवारी (ता. २२) शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासह बैठक झाली. मंचर शहरात विद्युत शवदाहिनीला मंजुरी मिळावी, साल (ता. आंबेगाव) सिद्धेश्वर मंदिर व घोडेगाव येथील हरिश्चंद्र देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्रस्तावित असून, त्यास मंजूरी मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात आवश्यक कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे व संबंधित खाते प्रमुखांना दिल्या. 

धामणी येथील २ कोटी ४६ लाख रुपये खर्चून पूर्ण झालेल्या मात्र दोन वर्षांपासून बंद असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी आढळराव पाटील यांनी केली. जुन्नर नगरपरिषदेला राज्य     शासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्राप्त झालेल्या १० कोटी निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळावी. पूर (ता. जुन्नर) येथील प्राचीन कुकडेश्वर मंदिरावरील कळसाचे काम पुरातत्व विभागाकडून होण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकारी व आदिवासी लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याबाबत आढळराव पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत लवकरच  बैठकी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. बैठकीस उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, शिवसेना जिल्हाप्रमुख माउली कटके, जिल्हासमन्वयक रवींद्र करंजखेले, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर तालुकाप्रमुख सुधीर फराटे व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचा योग्य मोबदला द्यावा'-तळेगाव दाभाडे-शिक्रापूर-न्हावरा- इनामगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. न्हावरे, निर्वी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव व तांदळी आदी गावातील सुमारे ६०० शेतकरी यामध्ये बाधित होत आहेत. शेतकऱ्यांचा महामार्ग कामाला विरोध नसून प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचा योग्य मोबदला द्यावा. अशी मागणी आढळराव पाटील यांनी केली. यांसंदर्भात संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांना सत्वर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A model solar power generation project should be set up at peth village says mp adhalrao patil