

पान ५
आधुनिक सिंचन शेतीसाठी
कृषी विद्यापीठ-जैन इरिगेशनमध्ये करार
काटेकोर शेती, स्वयंचलित सिंचन प्रणालीला गती मिळणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : संशोधन, शिक्षण, विस्तार तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. काटेकोर शेती, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि डिजिटल शेती या क्षेत्रांत संयुक्त संशोधन तसेच संस्थात्मक सहकार्य वाढविणे हा या कराराचा उद्देश आहे.
जळगाव येथे झालेल्या या करारावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल ढाके यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, डॉ. प्रमोद पोपळे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील आणि डॉ. बाळकृष्णन, तीळ पैदासकार डॉ. सुमेरसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
करारांतर्गत सिंचनाच्या स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रमुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे. विद्यापीठातील कृषी व कृषी अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणाऱ्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.
या सहकार्यामुळे आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीतील संशोधनाला गती मिळून विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि संशोधनाधारित तंत्रज्ञानाच्या प्रसाराला चालना मिळणार असल्याचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले.
फोटो ओळ :
जळगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ व जैन इरिगेशन यांच्यात आधुनिक सिंचन शेतीसाठी झालेल्या सामंजस्य कराराप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व इतर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.