अर्थसंकल्पातून कृषी आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा - मोदी
कृषी आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा
पंतप्रधान मोदी; अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देण्यास कटिबद्ध
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ६ ः ‘‘या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाने कृषी आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला बळकटी देणे हे देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ‘कृषी आणि ग्रामीण परिवर्तन’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
कृषी, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यांचा समन्वय साधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. ‘‘मागील काही वर्षांत केंद्र सरकारने कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे विमा दावे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक जोखीम कमी झाली असून त्यांना सुरक्षितता मिळाली आहे,’’ असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.
निर्यातीवर भर
जागतिक बाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारतातील कृषी क्षेत्र अधिक निर्याताभिमुख बनवण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतातील विविध हवामानाचा योग्य वापर करून उत्पादनक्षमता आणि निर्यात क्षमता वाढवता येईल, असे मोदी म्हणाले. उच्च मूल्य असलेल्या पिकांच्या लागवडीला चालना दिल्यास भारतीय कृषी क्षेत्र जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. ‘‘निर्यातक्षम कृषी उत्पादन वाढल्यास प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील,’’ असेही मोदी यांनी सांगितले. मत्स्यपालन क्षेत्रातील संधींचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
तंत्रज्ञानाच्या वापरावर भर
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान वापरावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘सरकार अॅग्रीस्टॅक या उपक्रमाद्वारे कृषीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था उभारत आहे. ई-नाम, डिजिटल जमीन सर्वेक्षण आणि शेतकरी ओळख प्रणाली यांसारख्या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्रात तांत्रिक परिवर्तन घडत आहे.’’ तंत्रज्ञान प्रभावी होण्यासाठी संस्थांनी ते स्वीकारणे आणि उद्योजकांनी त्यात नवकल्पना करणे आवश्यक असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने पंतप्रधान घरकूल आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांचा उल्लेख करत मोदी यांनी ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचे सरकारचे प्रयत्न अधोरेखित केले. तसेच ‘लखपती दीदी’ अभियानाचा संदर्भ देत २०२९ पर्यंत तीन कोटी महिलांना यशस्वी उद्योजक बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

