esakal | खर्चात कपात करा, पण हाताचे काम काढू नका : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

pawar.jpg

मंदीचे संकट असले तरी खर्चात कपात करण्यासारखे उपाय करा, पण लोकांच्या हाताचे काम कोणीही काढून घेऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत केले. 

खर्चात कपात करा, पण हाताचे काम काढू नका : शरद पवार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती शहर : मंदीच्या संकटामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत राहिले तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही आणि त्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिला.

मंदीचे संकट असले तरी खर्चात कपात करण्यासारखे उपाय करा पण लोकांच्या हाताचे काम कोणीही काढून घेऊ नका, असे आवाहनही पवार यांनी केले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची भाजी मार्केट येथील तीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या विस्तारीत नवीन भाजीपाला विक्री सेलहॉल तसेच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपासह संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वाराचे उदघाटन आज पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती शौकत कोतवाल, उपसभापती शशिकला वाबळे, सचिव अरविंद जगताप यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले, देशामध्ये मंदीचे संकट आहे, जो पर्यंत गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत मंदीच्या संकटातून देश बाहेर येणार नाही. क्रयशक्ती वाढत नाही तो पर्यंत व्यापार वाढणार नाही, व्यापार वाढत नाही तो पर्यंत मंदीवर मात करणे अवघड होते. अनेक क्षेत्राला मंदीच्या संकटाची किंमत मोजावी लागते.
आज पाच लाखांवर लोकांच्या हाताचे काम गेलेले आहे. 
मंदीमुळे आलेल्या संकटावर मात करताना अनावश्यक खर्च कमी करा, नोकरकपातीचा मार्ग शेवटचा उपाय म्हणून वापरा. नोकरकपातीने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, अशी भीती पवार यांनी बोलून दाखविली.

दरम्यान, एकीकडे महापूराने पिकाचे प्रचंड नुकसान व दुसरीकडे मंदीचा तडाखा अशा दुहेरी संकटात सध्या लोक सापडले आहेत. महापूर व दुष्काळ अशा दोन्ही बाबी एकाच वेळेस आल्याने व्यापार व व्यवहार मंदावला व सध्या एका दुष्टचक्रातून राज्याची वाटचाल सुरु आहे. पण यातून बाहेर पडण्यासाठी खर्च कमी करुन संकटावर मात करु असे आवाहन पवार यांनी केले. 

loading image
go to top